- सचिन धानजी,मुंबई
मुंबई महापालिकेची (BMC) आर्थिक स्थिती कमजोर असल्याचे आता प्रशासनही मान्य करू लागले असून या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी नवीन कोणत्याही प्रकल्प तसेच योजनांसाठी पैसे न खर्च करण्याचा निर्धार केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेले प्रकल्प तसेच योजनांना पुढे रेटून नेण्याचा प्रयत्न महापालिका आयुक्त करणार आहेत. त्यामुळे भविष्यात शासनाकडून कोणतीही योजना महापालिकेच्या तिजोरीतून पैसा खर्च करुन राबवण्यासही लाल दिवा दाखवला जाणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नव्या आयुक्तांकडून महापालिकेची आर्थिक स्थिती नियंत्रणात ठेवली जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (BMC)
मुंबई महापालिका (BMC) आयुक्तपदाची सुत्रे २० मार्च रोजी भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी हाती घेतल्यानंतर काही दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्त(प्रकल्प) अभिजित बांगर (Abhijit Bangar) यांच्यासह महापालकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीतील सादरीकरणानंतर सध्याची आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयुक्तांनी नवीन कोणत्याही प्रकल्पांची कामे किंवा योजना हाती न घेण्याचा निर्धार केल्याची माहिती मिळत आहे. (BMC)
मुंबई महापालिकेने (BMC) यंदा सन २०२४- २५चा ५९ हजार ९५४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. मात्र, यंदा प्रकल्प कामांसाठी २५ हजार २३६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महापालिकेने आतापर्यंत १ लाख ९९ हजार २८३ कोटी रुपयांची विविध प्रकल्पांची कामे हाती घेतली, परंतु या कामांचाही खर्च आता २ लाख १५ हजार कोटींच्या वर जावून पोहोचला आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडे सध्या सुमारे ८७ हजार कोटींच्या ठेवी शिल्लक असल्या तरी त्यातील काही राखीव निधी आणि कंत्राटदारांची अनामत रक्कम वगळता महापालिकेकडे केवळ ४५ हजार कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. त्यामुळे सव्वा दोन लाख रुपयांच्या प्रकल्पांसाठी पैसा कुठून आणायचा हा प्रश्न उपस्थित होत आहे. (BMC)
(हेही वाचा- Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाला सायबर पोलिसांकडून समन्स, प्ले बेटिंग अॅप प्रकरणात २९ एप्रिलला नोंदवणार जबाब)
यापूर्वीचे आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी महापालिकेच्या तिजोरीत हात घालून शासन सांगेल त्याप्रमाणे प्रकल्पांसाठी तसेच योजनांवर पैसा खर्च करण्यास मान्यता दिली. महापालिकेच्या तिजोरीतून शासनाच्या अधिकारातील कामे आपल्या अंगावर घेतली गेली. त्यामुळे प्रकल्पांसह योजनांचा खर्च वाढला गेला असून याचा ताण महापालिकेच्या तिजोरीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर गगराणी यांच्याकडून आर्थिक स्थितीचा आढावा घेणे अपेक्षित होते. त्यामुळे हा आढावा घेतल्यांनतर महापालिका आयुक्तांनी चालू विकासकामांसह प्रकल्पांना गती देणे आणि नवीन प्रकल्पांसह इतर कोणत्याही कामांवर खर्च न करणे असा निर्धार केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे विद्यमान महापालिका आयुक्त महापालिकेची आर्थिक स्थिती नियंत्रणात ठेवतील असा विश्वास आता निर्माण होऊ लागला आहे. (BMC)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community