दक्षिण मुंबईतील ‘या’ कोविड सेंटरमध्ये वाढणार ७०० ऑक्सिजन खाटा

महापालिकेने आता या सेंटरमध्ये ऑक्सिजन प्रणालीचा अवलंब करत ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यावर भर दिला.

128

मुंबईत कोरोना रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरपैकी एकमेव असे कोविड सेंटर आहे, जिथे ऑक्सिजन बेडची सुविधा नव्हती. ते सेंटर म्हणजे भायखळ्याचे रिचर्डसन अँड क्रुडास. एक हजार खाटांच्या क्षमतेच्या सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड नसल्याने लोकप्रतिनिधींकडून तक्रारी झाल्यानंतर, आता या ठिकाणी व्यवस्था केली जात असून, तब्बल ७०० खाटा या ऑक्सिजन प्रणाली आधारित असणार आहेत. ज्यामुळे दक्षिण मुंबईतील रुग्णांना या सेंटरमध्ये उपचार करणे सोपे जाईल.

ऑक्सिजन प्रणाली उभारण्यावर भर

मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडास कोविड सेंटर हे १ हजार खाटांचे असून, त्याचा वापर आजवर क्वारंटाईन करता केला जात होता. परंतु याठिकाणी ऑक्सिजनची सुविधा नव्हती. त्यामुळे ऑक्सिजन बेड अभावी दक्षिण मुंबईतील रुग्णांना वरळीतील एनएससीआय किंवा बीकेसी याठिकाणी हलवावे लागत असे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात कोविड सेंटर उभारुनही दक्षिण मुंबईतील रुग्णांना याचा लाभ मिळत नव्हता. परंतु आता तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिकेने आता या सेंटरमध्ये ऑक्सिजन प्रणालीचा अवलंब करत ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यावर भर दिला.

(हेही वाचाः मुंबईत एका दिवसात ‘लक्ष’ लसीकरणाचे ‘लक्ष्य’ पूर्ण)

एक महिन्यात काम पूर्ण होणार

एक हजार खाटांच्या क्षमतेच्या या जंबो कोविड फॅसिलिटी सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड सुविधा पुरवण्यासाठी संकल्पचित्रे, अभियांत्रिकी सेवा पुरवठा, उभारणी, चाचणी आणि कार्यान्वित करणे तसेच याची देखभाल व दुरुस्तीच्या अनुषंगाने निविदा मागवली. यामध्ये स्टार इलेक्ट्रिक ही कंपनी पात्र ठरली असून, या कंपनीला सुमारे पाच कोटी रुपयांचे काम देण्यात येत आहे. या कंपनीने यापूर्वी गोरेगाव नेस्को एक्झिबिशन सेंटरमधील हॉल क्रमांक २ मधील आयसीयू आणि इलेक्ट्रिकची कामे केली आहे. त्यामुळे येत्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असून पुढील एक महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नगरसेवकांनी केली होती मागणी

याठिकाणी ऑक्सिजन बेड तसेच आयसीयू बेडची सुविधा नसल्याने भायखळ्यातील समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका सोनम जामसूतकर यांनी या कोविड सेंटरमधील असुविधेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे यातील ऑक्सिजन व आयसीयू बेड वाढवण्याची मागणी केली होती. या सेंटरमध्ये कोणतीही सुविधा न पुरवता महालक्ष्मी रेसकोर्स याठिकाणी नवीन सेंटरवर कोट्यावधी रुपये खर्च करण्याच्या मुद्दयावरुनही त्यांनी नाराजी व्यक्त केली हेाती. जिथे सेंटर उभे आहे, तिथे प्रथम सुविधा पुरवा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे अखेर प्रशासनाने याठिकाणी ऑक्सिजन व आयसीयू बेड सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचाः ‘त्या’ कंत्राटदारावर मुंबई महापालिका मेहेरबान! का? वाचा…)

या कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. कुमार दुस्सा यांच्याशी संपर्क साधला असता, या सेंटरमध्ये पूर्वी ऑक्सिजन बेडची सुविधा नव्हती. परंतु आता ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ऑक्सिजन प्रणाली बसवण्यासाठीची कामे हाती घेण्यात येत आहेत. यामध्ये एकूण १ हजार खाटांपैकी ७०० खाटा या ऑक्सिजन प्रणालीवर आधारित असतील. यातील पहिल्या टप्प्यात ५०० खाटा आणि दुसऱ्या टप्प्यात २०० खाटा याप्रमाणे ७०० खाटा ऑक्सिजन प्रणालीवरील असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.