मुंबईतील शाळांमधील शिक्षकांना शासनाच्या नवीन मार्गदर्शक धोरणानुसार घरुनच काम करणे(वर्क फ्रॉम होम) या संकल्पनेनुसार काम करण्याचे निर्देश महापलिका शिक्षण विभागाने दिले आहेत. मुंबईत मागील काही दिवसांपासून कोविडचे रुग्ण वाढू लागल्याने महापालिका शिक्षण विभागाने परिपत्रक जारी करुन १७ मार्चपासून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत घरुनच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जावे, असे निर्देश दिले आहेत.
ई-लर्निंगचा वापर
मुंबईतील शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत महापलिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्या स्वाक्षरीने १६ मार्च २०२१ रोजी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकात विद्यार्थ्यांना करावयाच्या अध्यापनाबाबत व शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत सूचना केल्या आहेत. यामध्ये इ-लर्निंग शैक्षणिक सुविधेनुसार आणि ऑनलाइन पद्धतीने(वर्क फ्रॉम होम) विद्यार्थ्यांना अध्यापन करावे. त्यानुसार सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा दिनांक १७ मार्च २०२१ पासून ते पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत विद्यार्थी उपस्थितीसह प्रत्यक्षात शाळा सुरू होईपर्यंतचा कालावधी कर्तव्यार्थ समजून संबंधितांनी तशा प्रकारच्या नोंदी मानव संसाधन प्रणालीतीळ शालार्थ प्रणालीमध्ये नोंदवाव्यात, असे निर्देश दिले आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास शाळा तथा कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
(हेही वाचाः महापालिका शाळांमधील मुख्याध्यापक बनणार ‘स्वावलंबी’!)
घरी राहून काम करणाऱ्या शिक्षकांनी दैनंदिन कामाची नोंद गुगल शीट, फॉर्म, वर्कशीटमध्ये कराव्यात व त्याचे पर्यवेक्षण संबंधित अधिकाऱ्यांनी पर्यवेक्षित करावे, अशाही सूचना केल्या आहेत.