- विशेष प्रतिनिधी, मुंबई
कुलाबा, वांद्रे, वरळी, मालाड, भांडुप, घाटकोपर या मलनि:सारण प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी प्रक्रिया करण्यात आलेले पाणी हे समुद्रात सोडण्याआधी या प्रकल्पाच्या ठिकाणी शुद्ध केले जाते. त्यामुळे आजही प्रक्रिया केलेले शुद्ध पाण्याचा वापर उद्यानासाठी इतर कामांसाठी केला न जाता हे पाणी थेट समुद्रात सोडले जात आहे. त्यामुळे यापूर्वी सोडलेल्या जाणाऱ्या मलवाहिनीतील पाण्याच्या तुलनेत आता शुध्द पाणी सोडले जात असल्याने समुद्रातील जलप्रदूषण रोखण्यात मोठे यश येत आहे.
महानगरपालिकेच्या मलनिःसारण प्रयोगशाळेला ‘एनएबीएल’ कडून मानांकन
मुंबई महानगरपालिकेच्या मलनिःसारण प्रयोगशाळेला राष्ट्रीय परीक्षण आणि अंश परीक्षण प्रयोगशाळा अधिस्विकृती मंडळ अर्थात एनएबीएल (National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories) यांचेकडून शुक्रवारी १३ सप्टेंबर २०२४ रोजी मानांकन प्राप्त झाले आहे. मलनिःसारण प्रयोगशाळेला मानांकन मिळणे म्हणजे मुंबई महानगराच्या पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. महानगरपालिकेची मलनिःसारण विभागाची प्रयोगशाळा ही १९३५ पासून कार्यरत आहे. प्रयोगशाळेसाठी आवश्यक तांत्रिक तसेच पायाभूत सुविधांचा विकास याठिकाणी करण्यात आला आहे. तसेच प्रयोगशाळेत काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना अद्ययावत पद्धतीचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
(हेही वाचा – Assembly Election : मतदारांच्या घरांपर्यंत पोहोचणार निवडणूक कर्मचारी; का आणि कशासाठी जाणून घ्या)
प्रयत्नांना मिळालेल्या यशापैकी एक
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पर्यावरणीय समतोल राखण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या अनेक प्रयत्नांपैकी मलनिःसारण प्रयोगशाळेचे अद्ययावतीकरण करण्यासाठी यापूर्वीपासून प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुविधा अद्ययावत करून या प्रयोगशाळेला मानांकन मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. मुंबईत मलनिःसारण व्यवस्थेमध्ये अधिकाधिक गुणवत्तापूर्ण सुधारणा व्हाव्यात यादृष्टीने होत असलेल्या प्रयत्नांना मिळालेल्या यशापैकी एक म्हणजे एनएबीएल मानांकन ठरले आहे.
मलनिःसारण प्रक्रिया केलेल्या पाण्याची तपासणी
मुंबई महानगरपालिकेला हे मानांकन प्राप्त झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले की, एनएबीएल मानांकन प्राप्त झाल्यामुळे आता महानगरपालिकेच्या मलनिःसारण प्रयोगशाळेचा अहवाल हा फक्त भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर विश्वासार्ह ठरणार आहे. कारण मलनिःसारण प्रकल्पातून पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा चाचणी अहवाल हा या मानांकनाची मोहोर उमटवलेला असेल. एवढेच नव्हे तर मलनिःसारण प्रक्रिया केलेल्या पाण्याची तपासणी मुंबई महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेत अधिकाधिक संख्येने होवून पर्यायाने महसूल वाढीसाठी देखील फायदा होणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी नमूद केले.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : विधानसभा निवडणूक दिवाळीपूर्वीच?)
गुणवत्तापूर्ण पाणी पुनर्वापरासाठी मिळणे हा चाचणीचा उद्देश
मोठ्या रहिवासी संकुलांच्या ठिकाणी मलनिःसारण प्रक्रिया करणारे प्रकल्प असावेत, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून सातत्याने करण्यात येत आहे. कारण पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर हा उद्यानासाठी तसेच शौचालयाच्या वापरासाठी करणे शक्य आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या मलनिःसारण विभागाच्या प्रयोगशाळेत तब्बल २२ निकषांवर आधारित पाण्याची चाचणी होते. पुनर्प्रक्रिया झालेले पाणी समुद्रात न सोडता विविध प्रकारच्या अपेय कारणांसाठी वापरात आणणे, हे चाचणी करण्याचे उद्दिष्ट आहे. गुणवत्तापूर्ण पाणी पुनर्वापरासाठी मिळणे हा चाचणीचा उद्देश आहे. मुंबईतील खासगी मलनिःसारण प्रक्रिया प्रकल्प चालकांनाही या प्रयोगशाळेतून पाणी तपासणी करणे शक्य आहे. महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेला मानांकन मिळाल्याने अशा चाचण्यांच्या संख्येत निश्चितच वाढ होईल, याची प्रशासनाला खात्री आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community