महापालिका मुलांच्या गणवेषाचा प्रस्ताव मंजूर, आता निधी हस्तांतरणासाठी प्रशासनाची धावाधाव

119

मुंबई महापालिका शाळांमधील मुलांसाठीच्या गणवेषाच्या प्रस्तावाला प्रशासकांनी मान्यता दिल्यानंतरही अद्याप या प्रस्तावाच्या खरेदीकरता कार्यादेश बजावण्यात आले नसल्याची माहिती समोर येत आहे. महापालिकेच्यावतीने २७ शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी अर्थसंकल्पात ठोसपणे तरतूद न केल्याने, यातील तांत्रिक अडचणींमुळे याचा प्रस्ताव संमत होऊनही याबाबतचे कार्यादेश बजावण्यात आले नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाची निधी हस्तांतरणासाठी धावपळ उडाली असल्याची माहिती मिळत आहे.

शिक्षण विभागाची निधी हस्तांतरणासाठी धावपळ

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांना दरवर्षी गणवेषासह इतर २७ शालेय वस्तूचे मोफत वाटप केले जाते. परंत मागील वर्षी कोविडचा काळ असल्याने सन २०२२-२३च्या अर्थसंकल्पामध्ये या वस्तूंसाठी ठोसपणे तरतूद केली नव्हती. त्यामुळे शिक्षण विभागाकरता इतर सांकेतांकमध्ये निधीची तरतूद केलेली आहे. त्यामुळे यंदा २७ शालेय वस्तूंच्या खरेदीला मान्यता दिल्यानंतर यासाठी केलेल्या ठोस तरतूद कमी पडू लागल्याने इतर ठिकाणांवरील निधी वळता करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे यापूर्वी मंजूर केलेल्या प्रस्तावांमधील शालेय साहित्यांचे वाटप सर्व शाळांमध्ये झाल्यानंतर आता गणवेष खरेदीचा शेवटचा प्रस्ताव जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मंजूर करण्यात आला. परंतु विविध सांकेतांकमध्ये तरतूद केलेल्या निधीचे हस्तांतरण करण्याच्या दृष्टीकोनातून या खरेदीचे सॅपद्वारे कार्यादेश बजावण्यात आले नसल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : रायगडमधील प्रकल्पबाधितांच्या समस्यांवर लवकरच तोडगा काढू – महसूल मंत्री )

मुंबई महापालिकेच्यावतीने अनेक वर्षांनंतर प्रथमच गणवेष बदलण्यात येत असून यासाठीची एकूण निविदा प्रक्रीयेला विलंब झाला होता. परंतु प्रत्यक्षात निविदा प्रक्रीया पूर्ण झाल्यांनतर प्रस्ताव मंजुरीनंतरही याचे कार्यादेश बजावण्यात आले नसल्याचे बोलले जात आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रस्ताव मंजुरीनंतर सॅपद्वारे कार्यादेश दिले नसले तरी पात्र कंपनीला पेपरद्वारे कार्यादेश बजावण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार गणवेषाच्या बनवण्याच्या कामाला सुरुवात करतील. यामुळे खरेदी प्रक्रीयेला कुठेही विलंब होणार नाही. काही तांत्रिक अडचणी असल्या तरी विविध सांकेतांकमध्ये तरतूद केलेल्या निधींचे हस्तांतरण करण्याची प्रक्रीया प्रशासकांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे निधी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित पात्र कंपनीला सॅपद्वारे कार्यादेश बजावण्यात येतील,असे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.