मुंबईला पाणी पुरवठा करणार्या तुळशी, विहार आणि तानसा या तलावांपाठोपाठ मोडकसागर तलावही गुरुवारी रात्री ओसंडून वाहू लागल्यानंतर आता पाणी साठ्यातही वाढ होत आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ७१.८४ टक्के एवढा पाणी साठा जमा आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पाणी पातळी आणि साठा यांचा आढावा घेऊन सध्या लागू असलेल्या दहा टक्के पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणार्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, आणि तुळशी या सात तलावांमधून दरदिवशी ३७५० दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी या सर्व धरण तथा तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. मात्र, २९ जुलै २०२३ रोजी या सर्व तलावांमध्ये १० लाख ३९ हजार ८२५ दशलक्ष लिटर्स एवढा पाणीसाठा जमा झालेला आहे. मात्र, मागील दोन वर्षांच्या तुलनेत अजूनही पाणी साठा कमी असून याच दिवशी मागील वर्षी ८८.१९ टक्के एवढा पाणीसाठा होता, तर २०२१ मध्ये या सर्व तलावांत ७२.२६ टक्के एवढा पाणीसाठा होता.
या सात तलावांपैकी चार तलाव भरले असले तरी मुंबईला ६० टक्क्यांहून अधिक पाणी पुरवठा करणार्या भातसा तलावांमध्ये ६३.७१ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे. तर चार तलाव भरल्यानंतर एकूण पाणी साठा ७१. ८४ टक्के झाल्याने १ जुलैपासून लागू केलेली दहा टक्के एवढी पाणीकपात मागे घेण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. त्यामुळे सर्व धरणांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक पाणी साठा जमा झाल्याने पुढील आठवड्यात याबाबतचा आढावा घेऊन पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय घेतला जावू शकतो,असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. काही निवृत्त जलअभियंत्यांच्या म्हणण्यानुसार जर पुढील आठवड्यात पाणी साठा ८० टक्क्यांहून अधिक पोहोचल्यास कपात मागे घेण्यास काहीच हरकत नाही. कपात मागे घेण्याची कोणतीही घाई करण्याची गरज नसली तरी ८० टक्क्यांहून अधिक साठा जमा झाल्यास कपात कायम ठेवणेही योग्य नसेल,असे त्यांचे म्हणणे आहे.
२९ जुलै पर्यंतचा पाणी साठा
- २०२३ : १० लाख ३९ हजार ८२५ दशलक्ष लिटर्स (७१.८४ टक्के)
- २०२२: १२ लाख ७६ हजार ३८२ दशलक्ष लिटर्स (८८.१९टक्के)
- २०२१: १० लाख ४५ हजार ९१६ दशलक्ष लिटर्स (७२.२६ टक्के)
(हेही वाचा Accident : पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात; २ पोलिसांचा जागीच मृत्यू)
Join Our WhatsApp Community