BMC : जळजोडणी आणि दुरुस्तीची कामे पूर्ण; ‘या’ भागांतील पाणीपुरवठा होणार सुरळीत

123
BMC : जळजोडणी आणि दुरुस्तीची कामे पूर्ण; 'या' भागांतील पाणीपुरवठा होणार सुरळीत
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा (टनेल शाफ्ट) दरम्यान नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी कार्यान्वित करण्‍याची कार्यवाही गुरूवारी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पूर्ण झाली आहे. ४४ अभियंते आणि २०० कामगार, कर्मचाऱ्यांनी ३० तास अविरत कार्यरत राहत जलवाहिनी कार्यान्वित करण्‍याबरोबरच दुरूस्‍ती कामे मार्गी लावली आहेत. त्‍यामुळे पाणीपुरवठा योग्‍य दाबाने, गळतीविरहीत होण्‍यास मदत मिळणार आहे. जलवाहिनी भारित (चार्जिंग) झाल्‍यानंतर एस, एल, के पूर्व, एच पूर्व, आणि जी उत्तर विभागांतील परिसरांचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. (BMC)

पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा (टनेल शाफ्ट) दरम्यान नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी अंथरण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे १८०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम या दोन जलवाहिन्या अंशतः खंडित करून नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमार्फत हाती घेण्यात आले. बुधवारी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून ते गुरुवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत, म्हणजेच एकूण ३० तास एस, एल, के पूर्व, एच पूर्व आणि जी उत्तर विभागांतील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्‍यात आला होता. (BMC)

(हेही वाचा – Ind vs Eng, 1st ODI : इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ४ गडी आणि ६८ चेंडू राखून विजय)

या ३० तासांच्‍या कालावधीत जल अभियंता खात्‍यातर्फे विविध दुरूस्‍ती कामे मार्गी लावण्‍यात आली आहेत. पवई तलाव, भांडुप, मरोशी, मोरारजीनगर, वांद्रे, विजयनगर पूल, सहार गाव, सहार कार्गो आणि धारावी आदी विविध ठिकाणी एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर दुरूस्‍ती कामे करण्‍यात आली. त्‍यात पवई उच्‍च पातळी जलाशय क्रमांक १ च्या जलवाहिनी गळतीचे बंदीस्तरण, झडपांची दुरूस्‍ती व गळती रोखणे, भांडुप टेकडी जलाशय क्रमांक १ च्या दोन्ही कप्‍प्‍यांचे विलगीकरण व स्‍वच्‍छता, मुख्य जलवाहिनीवर छेद (थ्रू कट) करणे, जलवाहिनीवर संरक्षक घुमट (डोम) बसविणे, जोडस्थानाचे (टॅपिंग) स्थलांतर करणे आदी कामांचा समावेश आहे. या विविध कामांमुळे एस, एल, के पूर्व, एच पूर्व आणि जी उत्तर विभागांतील पाणीपुरवठ्याचे बळकटीकरण होणार आहे. (BMC)

मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त अभिजीत बांगर यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि जल अभियंता पुरूषोत्‍तम माळवदे यांच्‍या नेतृत्‍वाखाली ३ उप जलअभियंते, ४ कार्यकारी अभियंते, ७ सहायक अभियंते, १५ दुय्यम अभियंते, १५ कनिष्‍ठ अभियंते आणि २०० कर्मचारी, कामगार यांनी ३० तास अविरतपणे कार्यरत राहत जलवाहिनी कार्यान्वित करणे, दुरूस्‍ती कामे पूर्ण केली आहेत. (BMC)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.