मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये वृध्दाश्रमाचे आरक्षण जाहीर करण्यात आल्यानंतर या आरक्षित भूखंडावर आता खऱ्या अर्थाने वृध्दाश्रमाच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. गोरेगाव पूर्व येथील जयकोच जवळ महापालिकेच्यावतीने ९ मजली वृध्दाश्रमाच्या नवीन इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. याबाबतची निविदा प्रकिया अंतिम टप्प्यात असून लवकरच सर्व प्रकारच्या मंजुरीनंतर निवड केलेल्या ठेकेदारांकडून प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या वृध्दाश्रमाचे बांधकाम झाल्यास हा महापालिकेचा पहिला वृध्दाश्रम ठरेल.
( हेही वाचा : दिवाळीत विद्युत रोषणाईने झगमगणार मुंबई नगरी!)
गोरेगाव पूर्व येथील जयकोच, श्रीराम मंदिर रोडवर रहेजा रिजवूडजवळ महापालिकेच्या मालकीचा भूखंड असून त्यावर पाच प्रकारचे आरक्षण आहे. त्यावर वृध्दाश्रमाचेही आरक्षण आहे. त्यामुळे महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने याठिकाणी वृध्दाश्रम बांधण्याचे प्रस्तावित केल्यानंतर याठिकाणी महापालिकेच्यावतीने इमारत बांधकाम विभागाच्यावतीने यासाठी निविदा मागवण्यता आली. या निविदेमध्ये अंतिम प्रक्रियेत कंत्राटदाराची निवड करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
महापालिकेच्यावतीने वृध्दाश्रमाकरता ९ मजल्याची इमारत बांधली जाणार असून या इमारतीच्या तीन मजल्यापासून नऊ मजल्यापर्यंत वृध्दांची राहण्याची सुविधा असेल. तर तळघर आणि तळ मजल्यावर वाहने व रुग्णवाहिकांच्या सुविधा तसेच दवाखाना, औषधांचे दुकाने, तसेच पहिल्या मजल्यावर ओपीडी आणि फिजिओथेरोपिस्ट आदींसह व्यवस्थापक व इतरांची व्यवस्था असेल, अशी माहिती मिळत आहे. या इमारतीत केवळ वृध्दाश्रमच नसेल तर पाळणाघराचीही सुविधा असेल अशीही माहिती मिळत आहे.
महापालिका वास्तुशास्त्रज्ञांनी तयार केलेल्या आराखड्यानुसार कामाच्या बांधकामाचे एकूण क्षेत्रफळ २ हजार ७५४ चौ.मी एवढे आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये एम.ई. इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीची निवड करण्यात आली असून या कंपनीच्या माध्यमातून विविध करांसह हे काम सुमारे १४ कोटी रुपयांमध्ये केले जाणार आहे. पुढील २० महिन्यांच्या कालावधीमध्ये ही इमारत उभी राहणे अपेक्षित असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांकडून दिली आहे.
महापालिकेचे अभियांत्रिका सेवा व प्रकल्प संचालक आणि उपायुक्त अतुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गोरेगाव पूर्व येथील आरक्षित भूखंडावर तळ अधिक ९ मजल्याचे बांधकाम महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील मंजुरीकरता महापालिका आयुक्त तथा प्रशासकांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या मान्यतेनंतर पुढील कार्यवाही केली जाईल,असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिकेच्या २०३४च्या विकास आराखड्यात २४ विभागांमध्ये २४ वृध्दाश्रम बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. पुढील २० वर्षांची ही तरतूद असून प्रायोगिक तत्वावर शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगराच्या मध्यवर्ती ठिकाणी वृध्दाश्रम बांधण्याचे काम हाती घेतले जावेत अशाप्रकारची नगरसेवकांची मागणी होती. विशेष म्हणजे नियोजन विभागाच्या तत्कालिन सहायक आयुक्त प्राची जांभेकर यांनी मालाड पूर्व येथे वृध्दाश्रम तथा डे केअर सेंटरसह पाळणाघर बांधण्यासाठी प्रथम प्रयत्न केले होते.
कशाप्रकारे असेल या इमारतीतील वृध्दाश्रमांची संरचना
- तळमजला अधिक ९ मजल्याची इमारत
- तळ मजल्यावर काय असेल: रुग्णवाहिका वाहनतळ, दवाखाना, मेडिकल दुकान, प्रशासकीय कार्यालय, व्यवस्थापक निवास,
- पहिला मजला – बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) फिजिओथेरपीची खोली आणि पाळणाघर
- दुसरा मजला : वृध्दाश्रमात राहणा-या व्यक्तींसाठी स्वंयपाकघर, उपहारगृह आणि लॉन्ड्री
- तिसरा ते आठवा मजला : वृद्धांसाठी एकेरी व दुहेरी राहण्याच्या खोल्या.
- नववा मजला : वृध्दांसाठी एकेरी राहण्याच्या खोल्या आणि मनोरंजनासाठी हॉल.