मुंबईतील पदपथांची पाण्याने सफाई

176

मुंबईत कधी काळी पाण्याने रस्ते धुतले जायचे… अशाप्रकारे पुन्हा रस्ते धुण्याची मागणी होत असली तरी ही मागणी काही मान्य होणारी नाही. परंतु मुंबईकरांना याचा सुखद अनुभव महापालिका प्रशासनाच्यावतीने दिला जाणार असून यासाठी पदपथ आता पाण्याने धुतले जाणार आहे. पदपथांवरील अडगळ साफ करून तो परिसर पाण्याने साफ करून पादचाऱ्यांना चालण्यास सुयोग्य असा मार्ग तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई महापालिकेच्या ए विभागाच्यावतीने अशाप्रकारे पथक तयार केले असून या पथकाच्या माध्यमातून पदपथांची स्वच्छता आणि झाडांची  निगा राखून त्यांचे सौंदर्य अबाधित राखण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहे.

( हेही वाचा : सरकारच्या निर्णयानंतरही मुंबईतील मराठी पाट्या ‘लटकल्या’! )

पाण्याची फवारणी करून पदपथांची साफसफाई

मुंबई महापालिकेच्या ए विभागाच्यावतीने पदपथ स्वच्छता पथक तयार करण्यात आले असून या पथकाच्या माध्यमातून महापालिका मार्गावरील पदपथ बुधवारी पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले आहेत. जेट स्प्रे मशीन द्वारे पदपथांवर पाण्याची फवारणी करून पदपथांची साफसफाई करण्यात आली आहे. या भागात मोठ्याप्रमाणात मेट्रो रेल्वेचे काम सुरु आहे. त्यामुळे पदपथांसह दुभाजकांवरील झाडांच्या रोपट्यांवरील धुरळा पसरला आहे. त्यामुळे आधीच पदपथ चालण्यायोग्य नाही, त्यातच ते धुळीने माखलेले असल्याने पादचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. त्यामुळे बुधवारी या पाण्याने धुतल्या गेलेल्या पदपथांवर चालताना पादचाऱ्यांना सुखद अनुभव  घेता येत होता.

BMC 10

पदपथ स्वच्छता पथक

महापालिकेच्या ए विभागाचे सहायक आयुक्त शिवदास गुरव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पदपथावर असलेली अडगळ  साफ करून तो परिसर स्वच्छ करावा तसेच झाडांच्या कुंड्यांमुळे पदपथाच्या सौंदर्यात कशाप्रकारे भर पडेल याचा  विचार करत विभाग कार्यालयाच्यावतीने पदपथ स्वच्छता पथक नेमण्यात आले आहे. या पथकाच्या माध्यमातून पदपथांवरील राडारोडा बाजूला करून घनकचरा विभागाच्या माध्यमातून हटवला जातो. तसेच पदपथावरील झाडांच्या कुंड्यांमध्ये कचरा असल्यास हटवून तो भाग स्वच्छ करणे आणि त्या कुंड्यांमध्ये माती घालणे अशाप्रकारच्या कामांचा समावेश आहे. त्यानुसार बुधवारपासून हे पथक कार्यरत झाले असून पहिल्या दिवशी महापालिका मुख्यालय परिसरातील पदपथांची स्वच्छता करून पाण्याने तो परिसर धुवून घेण्यात आला आहे. या पथकांमध्ये जेट स्प्रे मशीन असून त्याद्वारे पदपथ पाण्याने धुतले जात असल्याने त्यांनी स्पष्ट केले. याप्रकारे प्रत्येक दिवशी महत्वाच्या ठिकाणच्या पदपथांवरील अडगळ दूर करून त्यांची स्वच्छता राखली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.