-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
दक्षिण मुंबईत कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशाहा मेहता उद्यान येथे वृक्षराजीच्या सान्निध्यात रपेट (ट्री वॉक) करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. मुंबईतील पहिल्याच अशा या उन्नत मार्गाच्या माध्यमातून स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) लगतच्या समुद्राचे सौंदर्यही पाहता येणार आहे. या माध्यमातून दक्षिण मुंबईत निसर्गाच्या सान्निध्यात भ्रमंती करण्याचा पर्याय ‘निसर्ग उन्नत मार्ग’ (एलिव्हेटेड नेचर ट्रेल) च्या माध्यमातून मुंबईकरांसह पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. याद्वारे एक नवीन पर्यटनस्थळ मुंबईत निर्माण झाले आहे. (BMC)
या निसर्ग उन्नत मार्गाचे लोकार्पण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते रविवार, ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) यतीन दळवी, जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे, सहायक आयुक्त (डी विभाग) मनीष वळंजू आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. (BMC)
(हेही वाचा – Maharashtra Weather : उष्णतेचा पारा ४० अंशावर; भाजीपाला, फळबागांना चटका)
हा उन्नत मार्ग मुंबईत पहिल्यांदाच विकसित
सिंगापूर येथे विकसित ‘ट्री टॉप वॉक’ या संकल्पनेशी साधर्म्य असलेला हा उन्नत मार्ग मुंबईत पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे. या उन्नत मार्गाशी संबंधित कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले होते. त्यानुसार विद्युतीकरणाची कामे तसेच वास्तुशी संबंधित कामे पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. (BMC)
या ठिकाणी समुद्राचे विहंगम दृश्य…
हा प्रकल्प महानगरपालिकेच्या डी विभाग अंतर्गत फिरोजशहा मेहता उद्यान आणि कमला नेहरू उद्यान याठिकाणी जल अभियंता विभागामार्फत विकसित करण्यात आला आहे. निसर्ग उन्नत मार्गाची लांबी एकूण ४८५ मीटर आणि रूंदी २.४ मीटर इतकी आहे. या मार्गावर एका ठिकाणी समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी ’सी व्हिविंग डेक’ देखील बांधण्यात आला आहे. (BMC)
(हेही वाचा – Madhya Pradesh मधील ख्रिस्ती शाळेत हिंदू मुलांचे ब्रेनवॉश; बेकायदेशीर वसतिगृहात ४८ मुलांचे धर्मांतर)
लाकडी फलाटाच्या उन्नत मार्ग
या प्रकल्प अंतर्गत लाकडी फलाटाच्या उन्नत मार्गावर चालण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. लाकडी कठडा (रेलिंग), दुतर्फा आधार देणारे खांब आणि लाकडी जोडणी सांधे अशा पद्धतीची रचना या मार्गावर करण्यात आली आहे. भक्कम पायाभरणीसह (पाईल फाऊंडेशन) पोलादी जोडणीचा आधारही या बांधकामाला देण्यात आला आहे. त्यासमवेत, आकर्षक अशा स्वरूपाची प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांच्या भेटीची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी एक्सेस कंट्रोल सिस्टिम (प्रवेश नियंत्रण प्रणाली) विकसित करण्यात आली आहे. प्रकल्प कक्षातून संपूर्ण उन्नत मार्गावर देखरेख ठेवणे तसेच भेट देणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. एवढेच नव्हे तर आपत्कालीन मार्गाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. (BMC)
तब्बल १०० हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी
मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या १०० हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी न्याहाळण्याची संधी देखील याठिकाणी मिळणार आहे. वनस्पतींमध्ये गुलमोहर, बदाम, जांभूळ, कांचन, ताड, फणस, रतन गुंज, सीता अशोक, अर्जुन, मुचकुंद, सप्तपर्णी, करमळ, विलायती शिरीष आदी प्रजातींचा समावेश आहे. पक्ष्यांमध्ये कोकीळ, ताडपाकोळी, घार, भारतीय राखी धनेश, खंड्या, तांबट, टोपीवाला पारवा/पोपट, हळद्या, नाचण/नाचरा/नर्तक, कावळा, शिंपी चिमणी, बुलबुल, लालबुड्या बुलबुल, साळुंकी, दयाळ, चिमुकला फुलटोचा, जांभळ्या पाठचा सूर्यपक्षी, शुभ्रकंठी, ठिपकेवाली मनोली आदी पक्षी पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच, सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सरडा, झाडसरडे, भारतीय सुळेदार सरडा, नाग, अजगर, नानेटी आदींचा समावेश आहे. लोकार्पणानंतर या निसर्ग उन्नत मार्गाला भेट द्यावी. अधिकाधिक नागरिकांनी निसर्गाच्या कुशीतील खजिना पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community