कोविडने पतीचा मृत्यू! महापालिका करणार गरजू, गरीब महिलांना मदत

कोविडच्या आजाराने ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले, अशा गरीब व गरजू महिला विधवांना आता महापालिकेच्यावतीने घरघंटी, शिवणयंत्र तसेच कापसाच्या वाती बनवण्याचे यंत्र देत त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. याबरोबरच सर्वसाधारण महिला आणि विधवा, घटस्फोटीत तसेच ४० वर्षांवरील अविवाहित महिलांनाही अशाप्रकारे घरघंटी, शिवणयंत्र तसेच वाती बनवण्याची यंत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुंबईत अशाप्रकारे प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागात ४ घरघंटी, ५ शिवण यंत्र व ४ वाती बनवण्याची यंत्रे दिली जाणार आहे.

जाहिरातीद्वारे अर्ज मागवून पात्र लाभार्थ्यांची निवड

मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून जेंडर बजेट मधून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी यंत्र सामुग्री खरेदी करून उपलब्ध करून दिली जात होती. त्यानंतर या यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान देण्यात येत होते. परंतु कोविड काळामुळे या योजना राबवण्यात आल्या नव्हत्या. परंतु आता पुन्हा ही योजना राबवून त्यामध्ये सर्वसाधारण महिलांसह विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या, ४० वर्षांवरील अविवाहित यांचा समावेश करताना ज्या महिलांच्या पतीचे निधन कोविड आजाराने झाले आहे, अशा गरीब व गरजू विधवा महिलांचाही समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे. महापालिकेने यासाठी तीन प्राधान्यक्रम बनवून त्याप्रमाणे नगरसेवकाच्या प्रत्येक प्रभागांमध्ये ४ घरघंटी, ५ शिवणयंत्र आणि ४ वाती बनवण्याचे यंत्र अशाप्रकारे २९५१ महिला लाभार्थ्यांची जाहिरातीद्वारे अर्ज मागवून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल तसेच पात्र लाभार्थ्यांना या यंत्रसामृग्रीचा लाभ दिला जाईल, असे महापालिका नियोजन विभागाने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – एसटी संपाचा तिढा कायम! २० डिसेंबरला होणार पुढील सुनावणी)

  • वाती बनवण्याची यंत्रसामुग्री : प्रती प्रभाग चार प्रमाणे एकूण ९०८

यंत्र खरेदीची किंमत:३२ हजार २३०

महापालिकेकडून दिली जाणारी रक्कम : ९५ टक्के म्हणजे ३१,५६८

लाभार्थ्याला खर्च करावी लागणार असलेली किंमत : १६६२

  • घरघंटी : प्रती प्रभाग चार प्रमाणे एकूण ९०८

घरघंटीची किंमत:२० हजार ०६१

महापालिकेकडून दिली जाणारी रक्कम : ९५ टक्के म्हणजे १९,०५८

लाभार्थ्याला खर्च करावी लागणार असलेली किंमत : १,००३

  • शिवणयंत्र : प्रती प्रभाग पाच प्रमाणे एकूण ११३५

यंत्र खरेदीची किंमत:१२ हजार २२१

महापालिकेकडून दिली जाणारी रक्कम : ९५ टक्के म्हणजे ११,६१०

लाभार्थ्याला खर्च करावी लागणार असलेली किंमत : ६११

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here