पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवर ६ ठिकाणी बृहमुंबई महानगरपालिकेद्वारे शौचालय उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. तथापि, या शौचालयांची उभारणी पूर्ण होईस्तोवर नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची शौचालये उपलब्ध करुन देण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी गुरुवारी महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीदरम्यान दिले.
द्रुतगती महामार्गाच्या खड्डे कामांवर लक्ष ठेवण्यासाठी पथके…
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग हे आता बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळ्याआधी या महामार्गावरील दुरूस्तीची कामे पूर्ण करून घ्यावीत. याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचा-यांची पथके तयार करून या कामांचा आढावा घेण्यात यावा, अशाही सूचना इकबाल सिंह चहल यांनी या बैठकीत दिल्या.
नालेसफाईच्या कामांकडे लक्ष द्या…
येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नालेसफाईची कामे प्रगतिपथावर असून ही कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याचे आणि त्यासाठी सह आयुक्त तसेच उपायुक्त आणि संबंधित विभाग स्तरिय सहाय्यक आयुक्त यांनी नियमितपणे पाहणी करावी व कामांचा आढावा घ्यावा, असेही निर्देश दिले आहेत.
विमानतळावरही आपला दवाखाना…
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या मुंबईकरांच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजने अंतर्गत आतापर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १५० पेक्षा अधिक ठिकाणी दवाखाने कार्यरत आहेत. या दवाखान्यांना मुंबईकरांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या दवाखान्यात ८ लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी उपचार घेतले आहेत. अशाच पद्धतीचा आपला दवाखाना हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळानजिक देखील सुरू करावा, असे निर्देश देखील महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी बैठकीदरम्यान दिले.
Join Our WhatsApp Community