सीबीएसई, आयसीएसई नंतर आता महापालिकेची केंब्रिज मंडळाचीही शाळा

महापालिकेने केंब्रिज मंडळाशी संलग्नता असणारी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

147

मुंबई महापालिकेच्यावतीने सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या शाळा सुरू करण्यात आल्यानंतर, आता महापालिका केंब्रिज मंडळाशी संलग्न असलेली शाळा सुरू करणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून माटुंगा पूर्व येथील एल.के. वागजी मार्ग महापालिका शाळेत ही केंब्रिज माध्यमाची शाळा सुरू केली जाणार आहे.

महापालिकेच्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना ज्या सुविधा दिल्या जातात, त्या सर्व सुविधा केंब्रिज मंडळाच्या महापालिका शाळेतही दिल्या जाणार असल्याचे महापालिका शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : वरळी किल्ल्यावर झगमगाट, पण वांद्रे किल्ल्याकडे दुर्लक्ष का? )

केंब्रिज बोर्डाची शाळा

सन २०२०-२१च्या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्यावतीने सीबीएसई व आयसीएसईच्या प्रत्येकी एक शाळा आणि सन २०२१-२२मध्ये सीबीएसईच्या १० शाळा सुरू करण्यात आल्या. या शाळांना उत्तम प्रतिसाद मिळत असून, चार हजार जागांसाठी सुमारे दहा हजार अर्ज प्राप्त झाले होते. या शाळांना मिळत असलेल्या प्रतिसादानंतर महापालिकेने केंब्रिज मंडळाशी संलग्नता असणारी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अशी असेल शाळा

माटुंगा पूर्व येथील एल.के.वागजी महापालिका शाळेत केंब्रिज बोर्डाची शाळा प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतची ही शाळा असेल आणि नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी तसेच प्रत्येक इयत्तेची एक तुकडी त्यात असेल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निर्णय

आपला पाल्य जागतिकीकरणात टिकून राहण्यासाठी व त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आर्थिक दुर्बल घटकातील पालक फक्त इंग्रजी माध्यमाच्याच नव्हे, तर परवडत नसतानाही सीबीएसई, आयसीएसई व केंब्रिज मंडळाच्या शाळेत प्रवेश घेताना दिसत आहेत. त्यामुळे या मंडळाच्या शाळा सुरू करण्याची गरज लक्षात घेऊन त्या सुरु करण्यावर भर दिला जात आहे. महापालिकेच्या हद्दीतील विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमाच्या शाळा उपलब्ध होऊ शकतील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

( हेही वाचा : शहरातील पुलांवर नजर! पाडलेले आणि बांधकाम सुरु असलेले पूलही सल्लागारांच्या यादीवर )

लवकरच अंमलबजावणी होणार

केंब्रिज मंडळाच्या निकषानुसार त्या शाळांमध्ये असलेला अभ्यासक्रम, शालेय, सह शालेय उपक्रम, मार्गदर्शक तत्वे व मूल्यमापन पध्दत या शाळेत राबवणे बंधनकारक आहे. २०२२-२३ नंतर प्रत्येक वर्षी नैसर्गिक वाढीने दहावी पर्यंतचे शिक्षण सुरू केले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या सभेत मंजूर झाला असून, आता महापालिकेच्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या मान्यतेनंतर याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.