मुंबई महापालिका क्षेत्रातील पावसाचे पाणी सुयोग्य प्रकारे वाहून जावे, यासाठी महापालिका सातत्याने अधिकाधिक प्रभावी प्रयत्न करत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महापालिका क्षेत्रातील पर्जन्य जलवाहिन्या, नाले व नद्या इत्यादींची नियमितपणे साफसफाई केली जाते. पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमध्ये अनेक ठिकाणी प्लास्टिक, वस्तू, कचरा इत्यादी टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास येत असून, यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा होऊन पाणी तुंबल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो.
ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापौर किशोरी पेडणेकर, सभागृहनेत्या विशाखा राऊत आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या अनुषंगाने विविध स्तरीय जनजागृती करण्यासह अधिक प्रभावी दंडात्मक कारवाई करण्याचे व सीसीटिव्ही द्वारे देखील निगराणी करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते.
करणार दंडात्मक कारवाई
त्यानुसार महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सदर बाबत यथोचित कार्यवाही सुरू करण्याचे आदेश महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याला दिले आहेत. या आदेशांनुसार आता मनपा प्रशासनाने याबाबत सर्वस्तरीय जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई करण्याचे सूतोवाचही केले असून, प्लास्टिकच्या पिशव्या, वस्तू, कचरा इत्यादी नाल्यांमध्ये टाकणा-या व्यक्तीवर २०० रुपयांची दंड आकारणी अधिक प्रभावीपणे केली जाणार आहे. त्याचबरोबर सीसीटीव्ही द्वारे देखील नियमितपणे अवलोकन करुन कचरा टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्याची बाबदेखील प्रशासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे.
(हेही वाचाः १३ व १४ जून रोजी अतिवृष्टीचा इशारा… मुंबई महापालिका सज्ज)
नाले साफ करुनही होतो कचरा
मुंबई महापालिका क्षेत्रातील पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी सातत्याने अधिकाधिक प्रभावी व्यवस्था करत असते. याअंतर्गत प्रामुख्याने पर्जन्य जलवाहिन्या, नाले इत्यादींची साफसफाई करणे, नवीन पर्जन्य जलवाहिन्या तयार करणे आणि त्यांचे परिरक्षण करणे इत्यादी कामे नियमितपणे करण्यात येतात. पण नाले साफ केल्यानंतरही त्यात कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे नाल्यात पाणी तुंबण्याची शक्यता वाढते. विशेष करुन प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे पाणी तुंबण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या बाबींना प्रतिबंध होण्यासह संबंधितांच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल व्हावा, या उद्देशाने आता जनजागृती कार्यक्रम हाती घेण्याचा महापालिका प्रशासनाचा मानस आहे. त्याचबरोबर सीसीटीव्हीद्वारे निगराणी करण्यासह दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे करण्याची बाब महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे.
अशी आहे नाल्यांची लांबी
महापालिका क्षेत्रातील मोठे नाले, छोटे नाले व मिठी नदी यांची एकूण लांबी सुमारे ६८९ किलोमीटर आहे. यापैकी मोठ्या नाल्यांची लांबी २४८ किलोमीटर, तर छोट्या नाल्यांची लांबी ही सुमारे ४२१ किलोमीटर आहे. याव्यतिरिक्त उर्वरित २० किलोमीटर एवढी लांबी मिठी नदीची आहे, अशीही माहिती मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याद्वारे देण्यात आली आहे.
(हेही वाचाः महापालिकेची ‘सॅप’ प्रणाली ९ ते २१ जुलैपर्यंत बंद राहणार! )
Join Our WhatsApp Community