रस्त्यांची कामे सुरू आहेत का? बंद रस्त्यांची माहिती मिळवा गुगलवर

111

मुंबईत भ्रमंती करत असताना आजकाल अनेक जण ‘गुगल’ मॅपचा वापर करतात. मात्र, अनेकदा विविध दुरुस्ती कामांसाठी रस्ते बंद असल्यास त्याची माहिती ‘गुगल’ मॅप वर अद्ययावत नसते. ज्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष त्या रस्त्याजवळ गेल्यानंतरच हा रस्ता बंद असल्याचे कळते. ही बाब लक्षात घेऊन व नागरिकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने मुंबई महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याद्वारे आता एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाअंतर्गत आता मुंबई महापालिकेचे जे रस्ते दुरुस्ती कामांसाठी बंद ठेवण्यात येतील, त्यांची माहिती अग्रीम स्वरूपात ‘गुगल’ला अधिकृतपणे कळवण्यात येणार आहे. यामुळे ‘गुगल मॅप’वर रस्ता शोधतेवेळी रस्ता बंद असल्याचे नागरिकांना सहजपणे कळणार आहे. तसेच बंद असलेल्या रस्त्याला पर्यायी मार्ग देखील ‘गुगल मॅप’ द्वारे दर्शविला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक तथा सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे.

(हेही वाचाः पेडणेकरांना अजूनही महापौर निवास सोडवेना!)

गुगलवर मिळणार माहिती 

शरद उघडे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील जे रस्ते विविध दुरुस्ती कामांसाठी किंवा स्थापत्य कामांसाठी पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार बंद असतील, त्यांची माहिती मुंबई महापालिकेद्वारे अधिकृतपणे ‘गुगल’ला ‘लेप्टन’ या संस्थेच्या सहकार्याने कळवण्यात येणार आहे. ही माहिती कळवल्यानंतर त्या पुढील २४ तासांमध्ये ही माहिती ‘गुगल मॅप’वर अद्ययावत करण्यात येणार आहे.

या मार्गावर केली चाचणी

या अनुषंगाने चाचणी स्वरुपात दक्षिण मुंबईतील ‘गणपतराव कदम मार्ग’ येथे सुरू असलेल्या कामांची माहिती ‘गुगल’ला कळवण्यात आली होती. ज्यामुळे आता सदर ठिकाणी लाल रंगातील ठळक ठिपक्यांची रेषा दिसत आहे. या रेषेवर ‘क्लिक’ केल्यानंतर हा रस्ता बंद असल्याचा कालावधी देखील दिसत आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर, आता याच धर्तीवर भविष्यात जे रस्ते बंद असतील, त्यांची माहिती ‘गुगल’ला कळवण्यात येणार आहे.

(हेही वाचाः वर्षा सोडून मुख्यमंत्री मातोश्रीकडे का धावले?)

इतर रस्त्यांची माहिती मिळणार

भविष्यात मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील रस्त्यांच्या कामांव्यतिरिक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एमएमआरडीए), वाहतूक पोलिस यंत्रणांच्या सहकार्याने मुंबई महापालिका क्षेत्रातील इतर रस्त्यांची माहिती देखील गुगल मॅपवर उपलब्ध करून देण्याचे मुंबई महापालिकेचे नियोजन आहे. तर यापूर्वी ‘कोविड -१९’च्या काळात मुंबई महापालिका क्षेत्रातील ‘कंटेनमेंट झोन’ची (विलगिकरण क्षेत्र) माहिती मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने व ‘गुगल’च्या सहकार्याने नागरिकांना ‘गुगल मॅप’वर उपलब्ध करून देण्यात आली होती, अशी माहिती या निमित्ताने मुंबई महापालिकेच्या माहिती-तंत्रज्ञान खात्याद्वारे कळवण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.