बापरे! कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या नावाखाली भलत्याच दिल्या लस! 

या लसीकरण दरम्यान प्रत्येकाकडून १,२६० रुपये घेण्यात आले, यात १८ पासून पुढील वयातील एकूण ३९० रहिवाश्यांना लस टोचण्यात आली.

कोरोनावरील लसीकरणाची पहिल्यापासून बोंब असतांना आता कथित लसीकरणाचा प्रकार मुंबईतील कांदिवली येथे एका उच्चभ्रू रहिवाशी संकुलात उघडकीस आला आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून कोरोनावरील लस म्हणून रहिवाश्यांना नेमकी कुठली लस दिली, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या लसीकरणामुळे अद्याप कुठल्याही रहिवाशाला कुठल्याही प्रकारचा त्रास अथवा साईडइफेक्ट्स झालेले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

परवानगीशिवाय ९ ठिकाणी लसीकरण मोहिमेचे केले आयोजन

महेंद्र सिंह (३९), चंदन सिंह, नितीन मोडे आणि करीम अकबर अली असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. महेंद्र सिंह हा १० वी नापास असून तो या ‘बोगस लसीकरणा’चा मास्टरमाइंड आहे. त्याने आतापर्यंत ९ ठिकाणी लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. मागील १७ वर्षांपासून महेंद्र हा मेडिकल असोसिएशनचा मेंबर आहे. त्याने लसीकरण मोहिमेचे नियम पायदळी तुडवत मनपाची परवानगी न घेता लसीकरण मोहिमेचे आयोजन केले होते, तसेच या लसीकरण केंद्रात कुठल्याही प्रकारचे डॉक्टर नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

(हेही वाचा : मनसुखच्या मृत्यूनंतर ‘तो’ रिपोर्ट बनवणारे डॉक्टर आता एनआयएच्या रडारवर)

प्रत्येक व्यक्तीडून १,२६० रुपये घेतले!

कांदिवली पश्चिमेकडील एस.व्ही. रोडवर असलेल्या हिरानंदानी हेरिटेज क्लब हाऊस या उच्चभ्रू सोसायटीमध्ये ३० मे रोजी येथील रहिवाश्यांसाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण दरम्यान प्रत्येकी सभासद यांच्याकडून प्रत्येकी १,२६० रुपये घेण्यात आले होते. या मोहिमेत १८ पासून पुढील वयातील एकूण ३९० रहिवाश्यांना लस टोचण्यात आली होती. लसीकरण झालेल्या रहिवाश्यांनी आयोजकाकडे कोविड प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमानापत्राची मागणी केली असता आयोजकांनी प्रत्येकाची माहिती एकत्र करून ऑनलाइन तुम्हाला प्रमाणपत्र मिळतील असे सांगण्यात आले होते. सोसायटीच्या कमिटीने दिलेल्या रहिवाश्यांच्या माहितीवरून अनेकांना वेगवेगळ्या संस्थेकडून प्रमाणपत्र प्राप्त झाले. अनेकांनी कोविन या वेबसाईटवर वर आपल्या लसीकरणाची नोंद तपासली असता त्यात त्याचा उल्लेख नसल्यामुळे अनेकांना या लसीकरणाबाबत संशय निर्माण झाला.

उत्तर प्रदेशात पळून गेलेल्या आयोजकांसह ४ जणांना अटक!

या प्रकरणी अनेकांनी कांदिवली पोलिस ठाण्यात धाव घेऊन बोगस लसीकरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी सविस्तर माहिती मिळवून प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थाकडे संपर्क साधून चौकशी केली, तसेच महानगर पालिकेला या लसीकरणाबाबत काही कल्पना होती का, याबाबत तपास केला असता आयोजकांनी मनपाकडून लसीकरणाबाबत कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. गुरुवारी रात्री कांदिवली पोलिस ठाण्यात आयोजकांविरुद्ध फसवणूक, बोगस दस्तऐवज प्रकरणी गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशात पळून गेलेल्या आयोजकांसह ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा : आता पंकजा मुंडे मैदानात! २६ जूनला ओबीसींसाठी ‘एल्गार’!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here