हिंदू संस्कृतीकडे पाठ फिरवली, ‘बहिष्कार’अस्त्राची धार वाढली!

119

बॉयकॉट बॉलिवूड या दोन शब्दांची धास्ती आता संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीने घेतली आहे. २०२० मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर देशभरात एकच वादळ उठले. हिंदी चित्रपटसृष्टीने STAR KIDS ला आपलसे करून आऊटकमर्सला कसा बाहेरचा रस्ता दाखवला याबाबतच्या उघड प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या अाणि बॉलिवूडच्या ‘सो कॉल्ड स्टार्स’ला त्यांच्या प्रोफाईलवरील ‘कमेंट’ सेक्शन ऑफ करावे लागले. याउलट काहींनी सोशल मीडियापासून ब्रेक घेतल्याचे जाहीर केले. याच काळात काही अभिनेत्रींची ड्रग्ज प्रकरणात चौकशी लागली आणि बॉयकॉट बॉलिवूडच्या ट्रेंडने देशभरात जोर पकडला. २०२२ मध्ये दृश्यम आणि घराणेशाहीला अपवाद ठरलेल्या कार्तिक आर्यनचा भुलभुलैया हे दोन सिनेमे सोडले तर इतर सर्वच हिंदी सिनेमांच्या नावांपुढे बॉयकॉटचा ठपका बसला.

बॉलिवूडची उलटी गिनती

आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान आणि सैफ अली खान यांसारख्या ‘खान’ मंडळीविषयी सोशल मीडियावर प्रचंड नाराजी आहे. पीके, माय नेम इज खान, लाल सिंग चड्डा या सिनेमांमुळे हिंदू प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या आणि सोशल मीडियावर बॉलिवूडला ‘उर्दूवूड’ किंवा ‘खानवूड’ म्हटले गेले. चित्रपट उद्योगावर मुसलमानांचे वर्चस्व आहे आणि ही खान मंडळी भारतीय आणि हिंदूंच्या विरोधात आहे, असा दावा ट्विटरवरील हिंदू संघटनांकडून करण्यात आला आणि बॉलिवूडवर ‘उलटी गिनती शुरु’ असे म्हणण्याची वेळ आली.

(हेही वाचा Makar Sankranti 2023: सचिन तेंडुलकरने स्वतःच्या हाताने बनवले तिळाचे लाडू; व्हिडिओ केला व्हायरल)

चित्रपटाला सुपरहिट करायचे याची दोरी प्रेक्षकांच्या हाती

भारतात जवळपास २०१४-१५ नंतर इंटरनेट युजर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुकवर विविध अपडेट येऊ लागले आणि तरूणाई सोशल मीडियावर पोल, डिस्क्रिप्शनच्या माध्यामातून व्यक्त होऊ लागली. एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवेल की नाही, प्रदर्शित झाल्यावर संबंधित चित्रपटाचा समाजावर काय परिणाम होईल अशी चर्चासत्रे सोशल मीडियावर सुरू झाली आणि तेव्हापासूनच कोणत्या चित्रपटाला सुपरहिट करायचे याची दोरी प्रेक्षकांच्या हाती आली. बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड अलिकडे प्रचलित झाला असला तरीही याची सुरुवात फार पूर्वीपासून झालेली आहे. याचे उदाहरण घ्यायचे झाले, तर संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत असो किंवा बाजीराव मस्तानी जेव्हा या ऐतिहासिक चित्रपटांचे ट्रेलर प्रदर्शित झाले तेव्हा सोशल मीडियावर युजर्सनी इतिहासाची मोडतोड केली म्हणून व्यक्त व्हायला सुरूवात केली. तसेच जेव्हा २०१० मध्ये शाहरुख खानने आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना स्थान देण्याची मागणी केली होती तेव्हाच त्याचा माय नेम इज खान हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर होता, पाकिस्तान प्रेमाचा फटका त्याच्या सिनेमाला बसला होता.

बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार का टाकला जातो?

कबीर सिंगसारखा प्रेमसंबंधावर भाष्य करणारा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर बॉलिवूडमुळे तरुणाईवर विपरित परिणाम होत आहे का, अशा विषयांवर वादविवाद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. व्यसनाच्या आहारी गेलेला नायक ‘रिअल लाईफ हिरो’ असू शकतो का, बॉलिवूड कसे आभासी जग पडद्यावर उभे करते याविषयी चर्चा होऊ लागल्या. याचदरम्यान बॉलिवूडमध्ये STAR KIDS चे आगमन होऊ लागले. त्यांच्यासाठी साऊथ व मराठी चित्रपटसृष्टींमध्ये गाजलेल्या कथांचे रिमेक करण्यात आले. खरेतर या रिमेकमुळे बॉयकॉट चळवळीला आणखी जोर मिळाला. मराठीच्या सैराटचे रुपांतर हिंदीत ‘धडक’मध्ये करण्यात आले आणि बॉलिवूडवर देशभरातून टीका करण्यात आली. सैराट चित्रपटाचा मुख्य उद्देश हा समाजातून जातीभेद नष्ट करणे हा होता परंतु ‘धडक’मध्ये कथा फक्त रंगवली गेली. याउलट पाश्चिमात्य संस्कृतीत अडकलेल्या बॉलिवूड चित्रपटांपेक्षा हिंदू परंपरांचा विचार रुजलेल्या दाक्षिणात्य सिनेमांना देशाने आपलेसे केले, याची अनुभुती ‘बाहुबली’चे रेकॉर्डब्रेक कलेक्शन पाहून आपल्याला येईल. त्यामुळे आता भविष्यात बॉलिवूडने जर खरा इतिहास, परंपरा, हिंदू संस्कृतीकडे पाठ फिरवली तर सोशल मीडियावरील बॉयकॉट बॉलिवूडचे प्रभावी अस्त्र काही दिवसात आणखी धारदार होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.