Terrorist : पुण्यात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण शिबीर; ‘आयसिस’चा अड्डा उद्ध्वस्त

157

‘आयसिस’च्या महाराष्ट्र गटाकडून तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढण्याचे काम सुरू होते. कोंढवा भागात दहशतवाद्यांना बाँम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आल्याचे राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासात उघडकीस आले आहे. कोंढव्यातील ‘आयसिस’च्या हस्तकांचा गट उद्ध्वस्त करण्यात आल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

एटीएसने मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतलेल्या झुल्फिकार अली बडोदावाला याने महंमद युनूस महंमद याकू साकी आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान यांना पुण्यात आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे. जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) साकी आणि खान यांचा शोध घेत असताना बडोदावाला याने त्यांना पुण्यात आणून त्यांच्या मार्फत बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

एनआयएने ‘आयसिस’च्या महाराष्ट्र गटाचा म्होरक्या डॉ. अदनान अली सरकार याला अटक केली होती. कोथरुड भागात दुचाकी चोरताना अटक केलेल्या दहशतवाद्यांशी डाॅ. सरकारचे संबंध असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली होती. एनआयएने आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करुन तरुणांची माथी भडकावल्याप्रकरणी मुंबई, ठाणे आणि पुण्यातून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती. दहशतवादी कारवायांमध्ये तरुणांना ओढण्यात हा गट सक्रिय होता. या गटाचे पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याचे उघडकीस आल्यानंतर एटीएसने पुण्यातील दाखल गुन्ह्यात बडोदावाला याला नुकतेच मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले आहे. बडोदावाला याने साकी आणि खान यांना पुण्यात आणून त्यांच्यामार्फत काही तरुणांसाठी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.

(हेही वाचा PM Narendra Modi : मागील ७० वर्षांत एकही युद्धस्मारक बांधले नाही – पंतप्रधानांचा हल्लाबोल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.