Mantralay : मंत्र्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयात बॉम्बची अफवा, एकाला अटक

144
राज्यातील स्पर्धा परीक्षा पारदर्शक व्हावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील एका तरुणाने चक्क नगर पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कॉल करून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देऊन खळबळ उडवून दिली होती. याप्रकरणी नगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या तरुणाला शेवगाव येथून अटक करण्यात आली आहे.
बाळकृष्ण ढाकणे (३४) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. बाळकृष्ण ढाकणे हा नगर जिल्हा शेवगाव तालुक्यातील शास्त्री नगर येथे राहतो. उच्च शिक्षित असलेला बाळकृष्ण याने अनेक वेळा स्पर्धा परीक्षा देऊनही त्याला नोकरी लागत नव्हती. या स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमात पारदर्शकता हवी यासाठी त्याने अनेक वेळा मुख्यमंत्री कार्यालय तसेच मंत्र्यांना फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या फोनची कोणी दखल घेत नसल्याचे बघून त्याने गुरुवारी सकाळी अहमदनगर पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांक ११२ वर कॉल करून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती.
या निनावी कॉलमुळे एकच खळबळ उडाली होती, मंत्रालयात सर्वत्र तपासणी केल्यानंतर हा कॉल अफवा पसरविण्यासाठी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी नगर येथील पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाथर्डी पोलिस ठाण्याचे सपोनि. रामेश्वर कायंदे यांनी पोलीस पथकासह कॉल करणाऱ्याचा शोध घेतला असता हा कॉल शेवगाव येथे राहणाऱ्या बाळकृष्ण ढाकणे याने केल्याचे निष्पन्न झाले. पाथर्डी पोलिसांनी शेवगाव येथून बाळकृष्ण ढाकणे याला ताब्यात घेऊन रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.