महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेले विक्रम भावे यांना गुरुवार, ६ एप्रिल रोजी जामीन मंजूर करण्यात आला. एक लाख रुपयांच्या जात जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
हल्लेखोरांना रेकी करण्यास मदत केल्याचा आरोप!
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेऊन अटक करण्यात आलेले ‘मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात’ या पुस्तकाचे लेखक तथा हिंदु विधीज्ञ परिषदेचे विक्रम भावे यांना ६ मे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन संमत केला. २५ मे २०१९ या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून मुंबई येथे विक्रम भावे यांना अटक करण्यात आली होती. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना ‘रेकी’ करण्यास मदत केल्याच्या ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भावे यांच्या जामीनाला स्थगिती मिळावी, यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने न्यायालयात अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती एस्.एस्.शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या विभागीय खंडपीठाने भावे यांचा जामीन संमत केला.
(हेही वाचा : रश्मी शुक्लांना होणार का अटक? उच्च न्यायालयाने काय म्हटले? )
सशर्त जामीन मंजूर!
भावे यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना १ लाख रुपयांचा जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेचे १ किंवा २ हमीदार या अटींसह जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या परिक्षेत्राच्या बाहेर न जाणे, आठवडाभर नियमित आणि त्यांनतर पुढील २ आठवडे २ वेळा पोलिस ठाण्यात उपस्थित रहाणे, त्यानंतर खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत आठवड्यातून एकदा पोलिस ठाण्यात उपस्थित रहाणे या शर्थी घालण्यात आल्या आहेत. भावे यांचा पासपोर्ट केंद्रीय अन्वेषण विभागाकडे जमा करण्यात येणार आहे. साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणू नये, पीडितांच्या कुटुंबाशी कोणत्याही प्रकारे संपर्क करू नये आणि पुराव्यांशी छेडछाड करू नये, तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही गुन्ह्यांत सहभागी होऊ नये, अशा अटीने न्यायालयाने घातल्या आहेत. ‘यांपैकी कोणत्याही अटीचे उल्लंघन केल्यास जामीन रहित होईल, असेही निर्णय देतांना खंडपीठाने स्पष्ट केले. भावे यांच्यासह हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव आणि मुंबई उच्च न्यायालयाचे ऍड. संजीव पुनाळेकर यांनाही केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली होती. त्यांची यापूर्वीच जामीनावर सुटका झाली आहे.
२ हल्लेखोर म्हणून ४ जणांवर आरोप!
या प्रकरणात सीबीआयने सुरुवातीला डॉ. तावडे यांना मास्टरमाईंड म्हणून अटक केली. त्यानंतर विनय पवार आणि सारंग अकोलकर हे फरार आरोपी मारेकरी आहेत असल्याचे सीबीआयने म्हटले. त्यानंतर आता सीबीआयने नालासोपारा स्फोटकेप्रकरणात काही जणांना अटक केली. त्यामधील आरोपींपैकी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावर डॉ. दाभोलकरांचे हल्लेखोर म्हणून ठेवण्यात आला आणि त्यांना रेकी करण्यासाठी विक्रम भावे यांनी मदत केल्याचा आरोप करत भावे यांना अटक केली. अशा प्रकारे सध्या तपास यंत्रणांनी २ हल्लेखोर म्हणून ४ जणांवर आरोप कसे ठेवले आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या तपासात सध्या तरी ठोस निर्णयापर्यंत तपास यंत्रणांना पोहचता आले नाही.
काय आहे हे प्रकरण?
- 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.
- मार्निंग वॉकसाठी सकाळी सव्वा सात वाजता दाभोलकर हे ओंकारेश्वर पुलावर आले होते.
- त्याआधीच २ हल्लेखोर त्या ठिकाणी दबा धरून होते. हल्लेखोरांनी डॉ. दाभोलकर यांच्या मागे येऊन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
- गोळ्या झाडण्यापूर्वी हल्लेखारांनी तेच डॉ. दाभोलकर आहेत का, याची खात्री केली होती.
- या प्रकरणी आधी पुणे पोलिस तपास करत होते, त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.
- मागील ७ वर्षांपासून तपास यंत्रणा तपास करत आहेत, मात्र अद्याप यात ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत.