पुरोगामी आणि विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राचा गवगवा केला जातो, मात्र त्याच राज्यात आजही मुलींना शिक्षणासाठी अथक प्रयत्न करावे लागत आहेत, असाच एक प्रकार सातारा जिल्ह्यात घडला आहे, त्याची थेट उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. जिल्ह्यातील काही मुली शाळेत जाण्यासाठी चक्क जीवघेणा प्रवास करत आहेत. दररोज त्यांना थेट कोयना धरणात उतरून प्रवास करावा लागत आहे.
ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. तरीही या परिस्थितीत निराश न होता या मुलींची शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा खरोखरच कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत न्यायालयाने या मुलींच्या शिक्षणासाठीच्या ध्येयाचे कौतुक केले. ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या घोषणेचे उद्देश साध्य करायचा असेल तर राज्य सरकारने मुलींना शिक्षणासाठी योग्य वातावरण देण्याची गरज आहे. जेणेकरून या मुलींना सुरक्षितपणे शाळेत जाण्या- येण्यासाठी सोईसुविधा उपलब्ध होतील आणि त्यांना शिक्षणासाठी योग्य परिस्थिती निर्माण होईल, असे निरिक्षणही यावेळी न्यायालयाने नोंदवले.
(हेही वाचा धक्कादायक! अनिल देशमुखांचा उत्पादन शुल्क खात्यातही बदल्यांचा भ्रष्टाचार? कुणी केले आरोप?)
होडीतून करावा लागतो प्रवास
सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात खिरखंडी या गावातील मुलींना शाळेत पोहोचण्यासाठी आधी जंगलातून आणि त्यानंतर स्वत:च होडी चालवून कोयना धरणाचा विशाल जलाशय पार करून पलिकडच्या शाळेत जावे लागत आहे. जावली तालुक्यातील व्याघ्र प्रकल्पात खिरखंडी गावाचा समावेश होतो. या भागात सकाळी 9 वाजता शाळा सुरू होते. त्यासाठी सकाळी 8 वाजता गावातील मुली शाळेला जायला निघतात. त्यांचा हा प्रवास होडीने सुरू होतो. सुमारे अर्धा तास वेगाने वाहणार्या वार्याचा सामना करत या मुली होडी चालवत कोयनेच्या दुसर्या तिरावर जातात. तिथे होडी थांबवून पुढे सुमारे 4 किलोमीटर काट्याकुट्यांतून आणि जंगलातून पायपीट करत दीड तासानंतर ‘अंधारी’ या गावात त्यांची शाळा आहे.
Join Our WhatsApp Community