गृहमंत्र्यांकडून गुन्हा घडत असताना गप्प का बसलात? परमवीर सिंगांना उच्च न्यायालयाने फटकारले! 

पोलीस अधिकारी, मंत्री आणि राजकारणी कायद्यापेक्षा मोठे आहेत का? स्वत:ला इतके मोठे समजू नका, कायदा तुमच्यापेक्षा मोठा आहे, असे हायकोर्टाने परमबीर सिंह यांना खडसावले. 

गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलिसांच्या बदल्यांसाठी पैसे मागतात, हे तुम्हाला माहित असताना तेव्हा तुम्ही गप्प का बसलात? तुम्ही तेव्हाच गुन्हा का दाखल केला नाही?, अशी विचारणा करत एक वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरला आहात, असा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना खडसावले.

तक्रारीशिवाय चौकशीचे आदेश कसे देणार?

परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावले. त्याची केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे चौकशी करण्याच्या मागणीसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे उच्च न्यायालयात बुधवारी, ३१ मार्च रोजी यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु झाली. त्यावर उच्च न्यायालयाने अनपेक्षितपणे परमबीर सिंग यांना खडसावले. तक्रार किंवा एफआयआरशिवाय सीबीआय चौकशीच्या आदेशाची मागणीच कशी करता?, असाही प्रश्न कोर्टाने यावेळी उपस्थित केला.

स्वत:ला इतके मोठे समजू नका!  

तुम्ही जे आरोप करत आहात त्याचा पुरावा काय? गृहमंत्र्यांकडून पैशांची मागणी केली जात असताना वा पैसे जमा करण्यास सांगितले जात असताना तुम्ही स्वतः तिथे होता का? अशी विचारणा करत तुमच्या आतापर्यंतच्या म्हणण्यावरून तुम्ही केलेले आरोप ऐकीव माहितीवर आधारित आहेत, असेही कोर्टाने सुनावले. तुम्ही पोलीस आयुक्त आहात. तुमच्यासाठी कायदा बाजूला का ठेवायचा? पोलीस अधिकारी, मंत्री आणि राजकारणी कायद्यापेक्षा मोठे आहेत का? स्वत:ला इतके मोठे समजू नका, कायदा तुमच्यापेक्षा मोठा आहे, असेही हायकोर्टाने म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here