बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सार्वजनिक जीवन जगत आहे. त्यामुळे तिच्या जीवनात काय घडत आहे, हे जाणून घेण्याचे स्वारस्य असणारच. प्रसारमाध्यमांनी ज्या बातम्या केल्या आहेत, त्या पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दिल्या आहेत. म्हणून त्या कपोलकल्पित नाहीत. यास्तव त्यातून बदनामी झाल्याचा दावा कसा होऊ शकतो? शिल्पा शेट्टी ही कायम तिच्याविषयी चांगलेच लिहिले जावे, अशी अपेक्षा करत आहे का ?, असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी केला.
माध्यमांना न्यायालय आदेश देऊ शकत नाही!
शिल्पा शेट्टी हिने तिचा पती राज कुंद्रा याला अश्लील व्हिडिओ बनवून ते संकेतस्थळांना विकत असल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर माध्यमांनी त्याविषयी बातम्या बनवताना शिल्पा शेट्टीचा उल्लेख केला. त्यावर नाराज होऊन शिल्पा शेट्टी हिने अशा प्रक्रारे चुकीच्या बातम्या देऊन आपली बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टीने गुगल, फेसबुक, युट्युब या समाजमाध्यमांसह काही प्रसारमाध्यमांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तसेच आपल्याविषयी बदनामीकारक वार्तांकन करण्यास मनाई आदेश देण्याची मागणी केली. त्यावर शुक्रवारी, ३० जुलै रोजी सुनावणी झाली. तेव्हा न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी पोलिसांच्या माहितीच्या आधारे दिलेल्या बातम्या मानहानीकारक कशा असू शकतात? त्यामुळे आम्ही सध्या कोणताही अंतरिम दिलासा देत नाही. आपल्या देशात पत्रकारीतेला पूर्ण स्वातंत्र्य आहे. तसेच आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्रही आहे. पत्रकारीता ही जबाबदारीपूर्णच असायला हवी, मात्र त्यांना न्यायालय आदेश देऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.
(हेही वाचा : मी पॅकेज देणारा नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री!)
२० सप्टेंबरपर्यंत सुनावणी तहकूब!
शिल्पा शेट्टीने केलेल्या दाव्याचा विचार केला, तर प्रसारमाध्यमे शिल्पा शेट्टीविषयी काही चांगले बोलणार नसतील, तर त्यांनी काहीच बोलू नये, असे माध्यमांना सांगण्यासारखे आहे. शिल्पा शेट्टी यांनी केलेल्या दाव्याचा अर्थ वेगळा निघतो. आमच्याबद्दल चांगले बोलणार नसाल, तर काहीच बोलू नका, असे मीडियाला सांगण्यासारखे आहे, असेही निरीक्षण न्यायमूर्ती पटेल यांनी नोंदवले. त्यावर शिल्पा शेट्टीचे वकील अॅड. बिरेंद्र सराफ यांनी आम्ही कोणावर बंदी घालण्याची मागणी करत नाही, मात्र वैयक्तिक पातळीवर टीकाटिप्पणी नसावी, अशी अपेक्षा आहे. त्यावर काही युट्युबरने केलेली आक्षेपार्ह विधाने व उत्तर प्रदेशातील कॅपिटल टीव्हीने प्रसिद्ध केलेला आक्षेपार्ह व्हिडिओ वेबसाईटवरून काढण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तर फिल्म विंडोच्या संस्थापक हीना कुमावत यांनी व्हिडिओ इंटरनेटवरून काढला असून पुन्हा अपलोड करणार नसल्याची वकिलांमार्फत सांगितले. सर्व प्रतिवादींना शिल्पा शेट्टीच्या दाव्यातील मुद्द्यांविषयी १८ ऑगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचा आदेश देत २६ ऑगस्टपर्यंत शिल्पा शेट्टीला प्रत्युत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. न्या. गौतम पटेल यांनी पुढील सुनावणी ठेवली २० सप्टेंबर रोजी ठेवली आहे.
Join Our WhatsApp Community