कोविड लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर ९ महिने (२७३ दिवस) पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांना बूस्टर डोस घेता येणार आहे. एकसंघ क्रमाने म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेसाठी जी लस घेतली असेल तीच लस बूस्टर डोस म्हणून देखील दिली जाईल. त्यासाठी हे नागरिक थेट खासगी लसीकरण केंद्रांवर येऊन म्हणजेच वॉक-इन पद्धतीने किंवा कोविन पोर्टलवर नोंदणी करून देखील लस घेवू शकतात. लस घेण्यासाठी येताना पहिली आणि दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक असेल. अर्थात आरोग्य कर्मचारी, आघाडीवरील कर्मचारी आणि ६० वर्षे पेक्षा अधिक वयोगटाचे नागरिक यास अपवाद असतील. या नागरिकांना पूर्वीप्रमाणेच शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर प्रतिबंधात्मक लस तथा बूस्टर डोस विनामूल्य मिळू शकेल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : बूस्टरसाठी व्हा सज्ज! कोणती लस घेणार, नोंदणी कशी कराल, प्रमाणपत्र मिळणार का? )
लसीकरण मोहीम
मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून राष्ट्रीय कोविड लसीकरण मोहीम अंतर्गत लसीकरण मोहीम सुरू झाली. मुंबईत १८ वर्षे पेक्षा अधिक वयोगटातील ९२ लाख ३६ हजार ५०० पात्र नागरिकांना दोन्ही मात्रा देवून लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यानुसार, पात्र लाभार्थ्यांना कोविड लसीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट १३ नोव्हेंबर २०२१ रोजी पूर्ण झाले. तर दोन्ही मात्रा देण्याची उद्दिष्टपूर्ती ५ एप्रिल २०२२ रोजी झाली.
महानगरपालिका केंद्रांवर विनामूल्य
३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १७ वयोगटातील आणि १६ मार्च २०२२ पासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण देखील सुरू करण्यात आले आहे. मात्र त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. १५ ते १७ वयोगटातील फक्त ५५ टक्के मुलांनी पहिली मात्रा तर फक्त ४१ टक्के मुलांनी दुसरी मात्रा घेतली आहे. १२ ते १४ वर्षे वयोगटातील फक्त १३ टक्के मुलांनी पहिली मात्रा घेतली आहे. लसीकरणाचे हे अत्यल्प प्रमाण म्हणजे चिंताजनक बाब आहे. कारण लसीकरण पूर्ण झाल्याने कोविड संसर्गावर नियंत्रण ठेवता येते, हे सिद्ध झाले आहे. येत्या जून- जुलै महिन्यात देशात कोविड संसर्गाची चौथी लाट येऊ शकते, असा इशारा तज्ञ वैद्यकीय मंडळींनी दिला आहे. जगातील अनेक देशात कोविडचा फैलाव अद्यापही सुरू आहे.
सर्व पालकांनी आपल्या पात्र पाल्यांचे कोविड लसीकरण त्वरेने पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कोर्बेव्हॅक्स तर १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सीन लस दिली जाते. ही लस शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर विनामूल्य तर खासगी केंद्रांवर सशुल्क उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचे लसीकरण त्वरेने पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community