बोरिवली श्रीकृष्ण नगरचा पूल शनिवारपासून होणार खुला

224

पश्चिम द्रुतगती महामार्ग व श्रीकृष्ण नगर, नागरी प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्र, अभिनव नगर, शांतिवन या भागाला जोडणारा बोरिवली (पूर्व) मधील श्रीकृष्ण नगर येथील दहिसर नदीवरील पूल शनिवारपासून लोकांसाठी खुला केला जात आहे. या परिसरातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी असणारा हा एकमेव महत्त्वाचा पूल आहे. या पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. एप्रिल २०२२ मध्ये हा जुना पूल पाडण्यात आल्यानंतर या पुलाचे विस्तारीकरण व पुनर्बांधणीचे काम तातडीने सुरु करण्यात आले होते.

मुंबई महानगरपालिकेच्या आर/मध्य विभागाच्या हद्दीत, बोरिवली येथील श्रीकृष्ण नगरात पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून दहिसर नदीवर पुनर्बांधणी होत असलेल्या वाहतूक पुलाचा पहिला टप्पा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी ११ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता खुला करण्यात येणार आहे.

संपूर्ण पुलाचे बांधकाम इंटिग्रेटेड डेक स्लॅब व ब्रीज पीलर पद्धतीने करण्यात येत आहे. पूर्ण पुलाची एकूण लांबी ४१.५ मीटर इतकी आहे. यामध्ये उत्तर व दक्षिण वाहिनीकरिता प्रत्येकी २ मार्गिका आहेत. स्पॅन लांबी ही १३.५० मीटर, १३.६० मीटर आणि १३.५० मीटर इतकी आहे.

संपूर्ण पुलापैकी, पहिला टप्पा ११ मीटर रुंदीचा असून त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी २००० घन मीटर काँक्रिट वापरात आले आहे. तसेच ४९० मेट्रिक टन लोखंड (रिइन्फोर्समेंट), ३०० मेट्रिक टन डांबर मिश्रण वापरात आले आहे. वाहतुकीसाठी या पुलाचे महत्त्व लक्षात घेता, पहिला टप्पा जलदगतीने पूर्ण करण्यात आला असून शनिवार तो खुला करण्यात येत आहे.

दुसऱ्या टप्प्यातील पुलाच्या कामाचा काही भाग वन विभागाच्या (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) अंतर्गत येत आहे. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. सदर प्रस्ताव प्रगतिपथावर आहे. वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त होताच दुसऱया टप्प्यात उर्वरित ११.३० मीटर रुंदीच्या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे

या सोहळ्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे, आमदार सुनील शिंदे, आमदार राजहंस सिंह यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल हे सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्यासह विविध मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.