अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपालकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपूलाचे काम मुंबई महानगरपालिकेकडून प्रगतिपथावर आहे. या कामाची पाहणी करून याचा आढावा अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी घेतला. यामध्ये ८० मीटर पैकी ३० मीटरचे काम पूर्ण झाले आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी दोन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा प्रकारचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधितांना दिले.
महानगरपालिका आणि रेल्वेची होणार संयुक्त बैठक
अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पूलाचे काम प्रगतिपथावर आहे. मुंबई महानगरपालिकेसोबत रेल्वे प्रशासनही त्यात सहभागी होत आहे. रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या पूलाच्या भागाचे पाडकाम मागील २ महिन्यात ८० मीटरपैकी ३० मीटर इतकेच रेल्वे कंत्राटदाराने पूर्ण केले आहे. रेल्वे पूल पूर्ण तोडून झाल्यानंतर महानगरपालिकेला उर्वरित कामाला वेग देता येणे शक्य होईल. त्या दृष्टीने कार्यवाही होण्यासाठी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी महानगरपालिका आणि रेल्वे यांची संयुक्त बैठक महानगरपालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
(हेही वाचा ५ फेब्रुवारीच्या हिंदू जन आक्रोश मोर्च्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; शुक्रवारी निर्णय)
पूलाच्या पुनर्बांधणीसाठी महानगरपालिकेने सादर केल्या संकल्पना
या उड्डाणपूलाच्या उत्तर बाजूकडील रस्त्याचे ७० टक्के काम महानगरपालिकेने पूर्ण केले आहे. तर दक्षिणेकडील बाजू पूलाचे तोड काम करण्यासाठी रेल्वेला आवश्यक असल्याने अद्याप या भागाकडे काम सुरू करता आलेले नाही. पूलाच्या पुनर्बांधणीसाठी महानगरपालिकेने सादर केलेल्या संकल्पना आराखड्याला रेल्वेने गुरुवारी, १ फेब्रुवारी रोजी मंजुरी दिली आहे. या मंजूर आराखड्यानुसार ते काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. त्यादृष्टीने नियोजनासाठी रेल्वे प्रशासनासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे, जेणेकरून ३१ मे २०२३ पर्यंत पूलाच्या दोन मार्गिका पूर्ण करून वाहतुकीसाठी खुल्या करता येणे शक्य होईल, असा विश्वास वेलरासू यांनी व्यक्त केला. या बैठकीला या पाहणीप्रसंगी उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) संजय कौंडण्यपुरे, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) (प्रभारी) प्रकाश सावर्डेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community