अरुणाचल प्रदेशात गुरुवारी, १६ मार्च रोजी कोसळलेल्या लष्करी हेलिकॉप्टर चित्तामधील दोन्ही पायलटचा मृत्यू झाला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. या हेलिकॉप्टरने अरुणाचल प्रदेशातील बोमडिला जवळून उड्डाण केले होते. उड्डाणानंतर थोड्याच वेळात हेलिकॉप्टरचा एटीसीशी संपर्क तुटला आणि बोमडिलाच्या पश्चिमेकडील मंडलाजवळ मोठा अपघात झाला.
माहिती मिळताच वैमानिकांसाठी शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र, काही तासांनंतर दोन्ही वैमानिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सध्या अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. यासोबतच वैमानिकांचे मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. लेफ्टनंट आणि मेजरला घेऊन हेलिकॉप्टर आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील मिसामरीकडे जात होते. लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितले की, सकाळी ९.१५ च्या सुमारास हेलिकॉप्टरचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी (ATC) संपर्क तुटला. त्यामुळे ते बोमडिलाच्या पश्चिमेकडील मंडलाजवळ हेलिकॉप्टर कोसळले.
(हेही वाचा आधार कार्डबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय)