गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसच्या शेवटच्या डब्याखालून धूर आल्याने आग लागल्याच्या समजातून प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. ही घटना मडुरा व सावंतवाडी स्थाकनादरम्यान घडली. याबाबतची माहिती गार्डला मिळताच एक्स्प्रेस सावंतवाडी स्थानकात (Sawantwadi Station) थांबवून पाहणी करण्यात आली.ही घटना गुरुवारी (२नोव्हेंबर) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास झाली.
त्यावेळी रेल्वेच्या चाकामधील ‘ब्रेक बाईडिंग’मुळे धूर आल्याचे समोर आले. त्यानंतर अग्निरोधक साहित्याद्वारे धुरावर नियंत्रण मिळविण्यात आले. मडगाव टर्मिनसवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी मांडवी एक्स्प्रेस नेहमीप्रमाणे सकाळी दहाच्या सुमारास मडगावातून निघाली. ती मडुरा स्थानकातून मार्गस्थ झाल्यानंतर काही अंतरावर गार्डच्या डब्याखालून धूर येत असल्याचे निदर्शनास आले.
(हेही वाचा :World cup 2023 : लंकेविरोधात विराटचं किंग, सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड मोडणार?)
काही प्रवाशांनी ते पाहताच गाडीला आग लागली असल्याचा समज करून आरडाओरड सुरू केली. रेल्वे गार्डच्याही ही घटना निदर्शनास आली. त्यांनी त्वरित सावंतवाडी स्थानकात संपर्क साधून याची माहिती दिली. तोपर्यंत गाडी सावंतवाडी स्थानकात दाखल झाली. या वेळी शेवटच्या गार्डच्या डब्यालगत असलेल्या महिला आरक्षित डब्यातील महिला प्रवाशांनी उतरुन प्लॅटफॉर्मवर धाव घेतली. काय झाले, हे कोणालाच कळले नव्हते. त्यामुळे या प्रवाशांमध्ये भितीचे सावट होते.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता हा ‘ब्रेक बाईडिंग’चा प्रकार असल्याचे निदर्शनास आले. या वेळी त्यांनी ब्रेकमधील तांत्रिक दोष असून घाबरून जाण्याचे कारण नाही, असे सांगून प्रवाशांना धीर दिला. अग्निरोधक कीटच्या सहाय्याने धुरावर नियंत्रण मिळविले. यानंतर तांत्रिक दोष दूर करून गाडी त्वरित पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली. अचानक झालेल्या घटनेमुळे प्रवाशांच्या काळजाचा ठोका मात्र चुकला. ब्रेकमधील तांत्रिक दोषामुळे ही घटना घडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community