भारतात गर्भाशयाच्या कर्करोगापेक्षाही स्तन कर्करोगाचे रुग्ण आता मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. मात्र बाजारात उपलब्ध कार्बोप्लॅटीन या औषधाच्या सेवनाने ६० टक्के स्तन कर्करोगाच्या रुग्णांच्या शरीरातील कर्करोगाची गाठ नष्ट करत असल्याचे महत्त्वपूर्ण संशोधन टाटा रुग्णाच्या कर्करोगतज्ज्ञांनी केले. शनिवारी परळ येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात आयोजित या संशोधनाविषयी डॉक्टरांनी माहिती दिली. रुग्णालयाचे संचालक डॉक्टर राजेंद्र बडवे या संशोधनाचे प्रमुख आहेत. डॉ सुदीप गुप्ता, डॉ नीता नायर, डॉ रोहिणी हवालदार, डॉ वैभव वनमाळी, डॉ वाणी परमार, डॉ सीमा गुलिया, डॉ जया घोष, डॉ शलाका जोशी, डॉ राजीव सरीन, डॉ तबस्सुम वडासारवाला, डॉ तेजस पन्हाळे, डॉ संगीता देसाई, डॉ तनुजा शेट, डॉ आसावरी पाटील, डॉ गर्वित चितकारा, डॉ सुष्मिता रथ, डॉ ज्योती वाजपेयी, डॉ मीनाक्षी ठाकूर यांनीही या संशोधनात सहभाग घेतला आहे.
स्तन कर्करोगात ट्रीपल निगेटीव्ह प्रकाराचा कर्करोग अत्यंत घातक समजला जातो. भारतात दर वर्षाला जवळपास १ लाख स्त्रियांना स्तन कर्करोगाचे निदान होत असल्याची माहिती डॉ. राजेंद्र बडवे यांनी दिली. १ लाख महिलांपैकी ३० हजार महिलांना ट्रीपल निगेटीव्ह स्तन कर्करोगाने ग्रासले आहे. ट्रीपल निगेटीव्ह स्तन कर्करोगावर कार्बोप्लॅटीन औषध कसे काम करते, यावरचे संशोधन सध्या अमेरिकेत आयोजित सॅन अँण्टेनियो ब्रेस्ट कॅन्सर सिम्पोजियम या परिषदेत डॉ सुदीप गुप्ता यांनी याबाबतचे संशोधन सादर केले आहे. सहा महिन्यांसाठी ही उपचारपद्धती ट्रीपल निगेटिव्ह स्तन कर्करोगबाधित महिलांना दिली गेली. २०१०-२०२० या काळात रुग्णालयात ट्रीपल निगेटीव्ह स्तन कर्करोगावर उपचार घेणा-या ७५० महिलांना कार्बोप्लॅटीन उपचारपद्धती दिली गेली. या औषधामुळे स्तन कर्करोग पुन्हा होण्याचे प्रमाण सहा टक्क्यांनी घटल्याचेही कर्करोगतज्ज्ञांच्या लक्षात आले.
( हेही वाचा: योगामुळे सुधारतेय स्तन कर्करोगाच्या रुग्णांच्या जगण्याची उमेद, TATA रुग्णालयातील महत्त्वपूर्ण संशोधन )
संशोधनाविषयी
स्तन कर्करोगात ट्रीपल निगेटीव्ह कर्करोगाच्या रुग्णांना केमोथेअरपी आणि रेडिएशन देऊनही कित्येकांना कर्करोगाची बाधा पुन्हा होते. त्यामुळे टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या कर्करोगतज्ज्ञांच्या टीमने केमोथेअरपी, रेडिएशन, शस्त्रक्रिया आदी उपचारपद्धतीत कार्बोप्लॅटीन औषधांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. ७५० महिलांना दोन गटांत विभागले गेले. दोन्ही गटामध्ये रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी केमोथेअरपी दिली गेली. पहिल्या गटातील महिलांना आठ आठवड्यातील प्रत्येक आठवड्यात पेक्लिटॅक्सेल ही केमोथेअरपी दिली गेली. दुस-या टप्प्यात दर तीन आठवड्यांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या केमोथेअरपी रुग्णांना दिल्या गेल्या. दुस-या गटातील महिला रुग्णांना कार्बोप्लॅटीन इंजेक्शनसह उपचारपद्धती दिल्या गेल्या. आठ आठवड्यांसाठी पेक्लिटॅक्सेल केमोथेअरपी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक आठवड्यात कार्बोप्लॅटीन इंजेक्शन दिले गेले. त्यानंतर वेगवेगळ्या केमोथेअरपी दिल्या गेल्या. दोन्ही गटांतील महिलांची केमोथेअरपी पूर्ण झाल्यानंतर सर्व महिलांना रेडिओथेअरपी दिली गेली.
निरीक्षण
- या उपचारपद्धतीत महिलांना स्तन गमावण्याचा धोका टाळता आला. शिवाय कर्करोगाची गाठही नष्ट करता आली. या संशोधनामुळे भारतात ४५ ते ५० वयोगटातील महिलांना ट्रीपल निगेटीव्ह कर्करोगाच्या जीवघेण्या आजारापासून वाचवता येणे शक्य होणार आहे. या वयोगटात प्रामुख्याने ट्रीपल निगेटीव्ह स्तन कर्करोगाच्या महिलांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे निरीक्षण कर्करोगतज्ज्ञांनी नोंदवले आहे.
- कर्करोग बरे होण्याचे प्रमाण पहिल्या गटात ६४.१ टक्के तर कार्बोप्लॅटीनम गटात ७०.७ टक्के होते.
- कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर पहिल्या गटातील रुग्णांचे आयुषमान ६६.८ तर कार्बोप्लॅटीनम गटात ७४.४ टक्के दिसून आले.
- कार्बोप्लॅटीम इंजेक्शन घेणा-या ४० ते ५० वयोगटातील महिलांमध्ये रोगमुक्त होण्याचे प्रमाण १२.५ टक्क्यांनी वाढले. ७४.२ टक्क्यांपर्यंत महिला रोगमुक्त जगत असल्यचे सिद्ध झाले तसेच आयुषमान ६५.९ टक्क्यांवरुन वाढत ७७.१ टक्क्यांवर आले. शिवाय केमोथेअरपीचे दुष्परिणामही कमी जाणवले.