वरळीतील ई मोझेस रोडपासून ते डॉ. अॅनी बेझंट रोडपर्यंतच्या नेहरु विज्ञान केंद्राला जोडून असलेल्या नाल्यावर वाहतुकीकरता पूलाची बांधणी करण्यात येणार आहे. याठिकाणी होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या नाल्यावरील पूलाची बांधणी केली जाणार असून याशिवाय नेहरु तारांगण आणि नेहरु सेंटरला येणाऱ्या मुलांना रस्ता ओलांडून जावे लागत असल्याने त्याठिकाणी भुयारी मार्गाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या रस्त्यांवरील पुलाच्या आणि भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या कामाच्या माध्यमातून काळ्या यादीत टाकल्यानंतर आपल्या अंगावरील डाग स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा एकदा आरपीएस इन्फ्रा ही कंपनीने महापालिकेत प्रवेश केला आहे. सनराईज स्टोन इंडस्ट्रीज, पिनाकी इंजिनिअर्स अँड डेव्हपर्स या संयुक्त भागीदारीतील कंपनींसह आरपीएस ही कंपनी या कामांसाठी पात्र ठरली आहे.
( हेही वाचा : Swiggy ला मोठा धक्का! ९०० रेस्टॉरंट होणार डिलिस्ट; ग्राहकांची सवलतही बंद )
मुंबई महापालिकेच्या जी-दक्षिण विभागातील वरळीमधील मरिअम्मा नगर आणि नेहरु विज्ञान केंद्र यामधून विकास नियोजन आराखड्यातील १८.३ मीटर रुंदीचा आरक्षित रस्ता असून हा रस्ता डॉ. अॅनी बेझंट रोड व डॉ. ई मोझेस रोड यांना जोडणारा आहे. या रस्त्यांच्यी सुधारणा महापालिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे. या रस्त्यांची सुधारणा करताना नेहरु विज्ञान केंद्रात येणाऱ्या मुलांना रस्ता ओलांडताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच हा रस्ता अपघात प्रवण क्षेत्र बनू नये म्हणून नेहरु तारांगण ते नेहरु विज्ञान केंद्र याठिकाणी शालेय मुलांसह इतरांना सुलभरित्या रस्ता ओलांडता यावा म्हणून पादचारी भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये आरपीएस, सनराईज आणि पिनाक ही संयुक्त भागीदारीतील कंपनी पात्र ठरली आहे. महापालिकेच्या माध्यमातून या निविदेसाठी २८० कोटी रुपयांचा अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला होता, तर यासाठी पात्र ठरलेल्या कंपनीने अंदाजित खर्चाच्या १५ टक्के कमी बोली लावून २३७.५१ कोटी रुपये आणि विविध करांसह ३५०.६६ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. याबाबतच्या प्रस्तावाला प्रशासकांची मान्यता प्राप्त झाली असून संबंधित कंपनीला कार्यादेश देण्यात आहे.
पुल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार विकास नियोजन आराखड्यातील प्रस्तावित डिपी रोडची कनेक्टीव्हीटी देण्यासाठी नेहरु विज्ञान केंद्राच्या बाजुने वाहणाऱ्या नाल्यावर पूलाची उभारणी करणे आवश्यक आहे. यामुळे येथील वाहतूक या पुलावरुन वळवता येईल आणि ज्यामुळे या स्त्यांचा वापर होऊन वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. तसेच या रस्त्यांचा वापर होणार असल्याने याठिकाणी येणारी लहान मुले तसेच इतर पाहुण्यांना रस्ता ओलांडताना त्रास होऊ नये म्हणून पादचारी भुयारी मार्ग बनवण्यात येत असून लवकर या दोन्ही कामांना सुरुवात होईल,असा विश्वास पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community