- सचिन धानजी
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) हस्तांतरित झालेल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले असून यामध्ये १० पुलांच्या मोठ्या दुरुस्त्या करण्याची आवश्यकता असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या महामार्गावरील ४२ पूल, भुयारी मार्ग आणि पादचारी मार्गांपैकी एकूण २२ पूल सुस्थितीत असल्याचे समोर आहे. त्यामुळे १० पुलांच्या मोठ्या स्वरुपातील दुरुस्त्या आणि १२ पुलांच्या छोट्या स्वरुपाच्या दुरुस्त्या करण्याची शिफारस मुंबई व्हिजेटीआयने केल्याची माहिती मिळत आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्ग व पूर्व द्रुतगती महामार्ग मुंबई महापालिकेला (BMC) हस्तांतरीत करण्यात आल्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पूलांचे सद्यस्थितीत संरचनात्मक रचना योग्य आहे का याच्या तपासणासाठी महापालिकेच्यावतीने मुंबई व्हिजेटीआयची निवड केली होती. पश्चिम द्रुतगती महामार्गावर उड्डाणपूल, वाहतूक भुयारी मार्ग, पादचारी भुयारी मार्ग, पादचारी पूल तसेच नाल्यावरील पूल अशा प्रकारे एकूण ४२ पूल असून यांचे या संस्थेकडून संरचनात्मक सर्वेक्षण करण्यात आले आहे.
(हेही वाचा BMC: क्लीनअप मार्शलकडून होणारी लूट अखेर थांबणार, येत्या ४ एप्रिलपासून संस्थांची सेवाच रद्द)
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२३ पासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ४२ पूलांच्या संरचनात्मक सर्वेक्षणास सुरुवात केली. तसेच संरचनात्मक परिक्षणानंतर संबंधित संरचनात्मक सर्वेक्षणाचे अहवाल या मुंबई व्हीजेटीआयने सादर केले आहेत. मुंबई व्हीजेटीआय मुंबई यांनी केलेल्या संरचनात्मक सर्वेक्षणानंतर आणि संबंधित संरचनात्मक सर्वेक्षणाच्या अहवालानंतर एकूण २२ पूल सुस्थितीत आहेत. तसेच १० पुलांकरीता मोठ्या दुरुस्त्या व १२ पुलांकरीता छोट्या दुरुस्त्या आवश्यक असल्याचे आढळून आले. त्यानुसार या पुलांच्या मोठ्या व छोट्या दुरुस्त्यांकरीता निविदा मागवून कामाला सुरुवात केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या सर्वेक्षणासाठी मुंबई व्हिजेटीआय कंपनीला १ कोटी ३३ लाख रुपये सल्लागार शुल्क म्हणून अदा केले जाणार आहेत. (BMC)
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पुलांची संख्या
- उड्डाणपूल : ०७
- वाहतूक भुयारी मार्ग :१०
- पादचारी भुयारी मार्ग :१३
- पादचारी पूल :१०
- नाल्यावरील मोठे पूल :०२
- एकूण : ४२
Join Our WhatsApp Community