बृहन्मुंबई क्रिडा व ललित कला प्रतिष्ठानच्या तिजोरीत खडखडाट!

जर बेस्टला आपण २१०० कोटी रुपयांची आर्थिक मदत केली, तर या प्रतिष्ठानला २० ते २५ कोटी रुपयांची मदत द्यायला हवी, अशी भूमिका मांडण्यात आली.

अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुल आणि मुलुंडमधील प्रियदर्शनी तसेच कालिदास नाट्यगृहाच्या जागा बृहन्मुंबई क्रिडा व ललित कला प्रतिष्ठानला चालवण्यात देण्यात आल्या असून प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी ही तिजोरी पूर्णपणे रिकामी केली आहे. या प्रतिष्ठानच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी भाजपकडून काही वर्षांपूर्वी होत असतानाच कोरोनाच्या नावाखाली या प्रतिष्ठानला बेस्ट उपक्रमाच्या धर्तीवर २० कोटी रुपये देण्याची मागणी  शिवसेनेने केली आहे. शहाजी क्रीडा संकुलातील अनेक जागा या परस्पर क्रीडा संस्थांना देण्यात आल्या असून याच जागेपासून प्रतिष्ठानला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त व्हायचे. परंतु येथील जागा शिवसेनेच्या मर्जीतील संस्थांना देण्यात आल्यानंतर यापासून मिळणाऱ्या महसूलावर पाणी सोडावे लागले. त्यामुळे यापासून झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून आता महापालिकेच्या तिजोरीतून पैसा काढून प्रतिष्ठानच्या खिशात घालण्याचा डाव शिवसेनेकडून सुरु आहे.

कोरोनामुळे क्रिडा बंद!

बृहन्मुंबई क्रिडा व ललित कला प्रतिष्ठानच्या अखत्यारित अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुल आणि मुलुंड कालिदास नाट्यगृह व प्रियदर्शनी जलतरण तलाव आदीच्या वास्तू येत आहेत. या दोन्ही ठिकाणी सुमारे १५० कामगार, कर्मचारी असून कोरोनामुळे खेळाच्या ऍक्टीव्हीटी बंद असल्याने येथील कर्मचाऱ्यांचा पगार द्यायलाही पैसे नसल्याचे सांगत शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांनी स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. याठिकाणी खेळाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे बेस्टला ज्याप्रमाणे कर्ज म्हणून आर्थिक स्वरुपात मदत केली, त्याच धर्तीवर ही २० कोटी रुपयांची मदत केली जावी, अशी मागणी राजुल पटेल यांनी केली.

(हेही वाचा : रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल होणार? सरकारची तयारी सुरू!)

बेस्टला २१०० कोटींची मदत, मग प्रतिष्ठानला का नाही?

आपत्ती निवारण पथकाला याठिकाणी जागा देण्याचा प्रस्ताव आला असता, भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी जागेचा भाडेकरार संपुष्टात आला आहे. त्यामुळे या भाडेकराराचे नुतनीकरण कधी करण्यात येणार आहे, अशी विचारणा केली. यावर बोलतांना सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी मागील आयुक्तांनी प्रतिष्ठानची बैठक बोलावली. परंतु कोरोनामुळे येथील सुविधा कोलमडून पडल्या आहेत. त्यामुळे जर बेस्टला आपण २१०० कोटी रुपयांची आर्थिक मदत केली, तर या प्रतिष्ठानला २० ते २५ कोटी रुपयांची मदत द्यायला हवी. हवे तर ही रक्कम नंतर परत घेतली जावी, असे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी प्रतिष्ठानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. तसेच प्रतिष्ठानच्यावतीने एकूण १८ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या, त्या ठेवी ६ कोटींवर आल्याची माहिती मुंबई लेबर युनियनच्या निदर्शनास आणून दिल्याचा संदर्भ देत गंगाधरे यांनी हा प्रकार धक्कादायक असून या प्रकरणाची चौकशी केली जावी,अशी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here