महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत महापालिका सुरक्षा रक्षक अजित सिंग यांना कांस्य पदक

95

मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलातील सुरक्षा रक्षक अजित सिंग यांनी पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील ‘रिले रेस’ या प्रकारातील धावण्याच्या शर्यतीत अव्वल कामगिरी करीत कांस्य पदक पटकावले. भांडुप संकुल येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अजित सिंग यांच्या या गौरवामुळे मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या गौरवाबद्दल अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी व सुरक्षा दल खात्याचे प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांनी अजित सिंग यांचे अभिनंदन करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

( हेही वाचा : ५५ प्रवाशांना न घेताच विमानाने घेतले टेक-ऑफ! DGCA ने कंपनीला बजावली नोटीस )

महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे अजित सिंग हे सन २०१४ पासून मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपली नोकरी सांभाळून ते दररोज व्यायाम करण्यासह धावण्याचाही नियमित सराव करीत असतात. अजित सिंग हे गेली १४ वर्षे विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवित असून गेल्यावर्षी लखनौ येथे झालेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत त्यांनी रौप्य पदक पटकावले होते. या व्यतिरिक्तही इतर अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवित त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सिंग यांनी आपल्या या यशाचे श्रेय कुटुंबियांसोबतच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलातील वरिष्ठांना व सहका-यांना दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.