- ऋजुता लुकतुके
बाँबे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या या कंपनीने शेअर बाजारात शुक्रवारी संध्याकाळी तसं लेखी कळवलं. ‘मी नव्याने स्वीकारत असलेल्या जबाबदारी आणि आताची जबाबदारी एकमेकांशी निगडित आहेत. त्यामुळे दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडता येणार नाहीत. त्यामुळे बीएसई कंपनीचं अध्यक्षपद मी तात्काळ सोडत आहे,’ असं अग्रवाल यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटलं आहे. (BSE President Resigns)
प्रमोद अग्रवाल आता टाटा स्टील कंपनीचे अतिरिक्त संचालक म्हणून ५ वर्षांसाठी टाटा समुहाबरोबर काम करणार आहेत. ही बातमी शुक्रवारी बाहेर आल्यावर बीएसईच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. एरवी हा शेअर २ टक्क्यांनी वधारला होता. पण, अध्यक्षांच्या राजीनाम्याची बातमी आल्यावर तो अचानक खाली यायला सुरुवात झाली. अखेर शुक्रवारी हा शेअर १६७ अंशांच्या म्हणजेच साधारण साडेतीन टक्क्यांच्या घसरणीसह ४,६९३ वर बंद झाला आहे. (BSE President Resigns)
(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीने जेव्हा सचिन तेंडुलकर समोर लोटांगण घातलं होतं…)
पण, शेअरमधील ही घसरण तात्पुरती असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. कंपनीचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल हे जानेवारी २०२४ पासून बीएसई कंपनीचे अध्यक्ष होते. अग्रवाल हे पूर्वी कोल इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. सनदी अधिकारी असलेले अग्रवाल दहा वर्षं देशातील सगळ्यात मोठ्या कोळसा उत्पादक कंपनीबरोबर होते आणि तिथली त्यांची कारकीर्द त्यांच्या कार्यप्रणालीमुळे विशेष गाजली. ते लोकप्रिय नेते होते. (BSE President Resigns)
अग्रवाल सिव्हिल अभियंता आहेत आणि १९८६ मध्ये त्यांनी मुंबई आयआयटीमधून बीटेक पदवी संपादित केली होती. त्यानंतर १९८८ मध्ये ते दिल्ली आयआयटीमधून एमटेक झाले. त्यानंतर लगेचच त्यांनी युपीएससी परिक्षेचा अभ्यास सुरू केला आणि ते सरकारी सनदी सेवेत दाखल झाले. मध्य प्रदेश सरकारबरोबर त्यांनी ग्रामीण विकास आणि पायाभूत उद्योग क्षेत्रात केलेलं काम उल्लेखनीय आहे आणि त्यासाठीच ते ओळखले जातात. (BSE President Resigns)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community