केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मंगळवारी 2022-23 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी देशात पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर केला असून देशात तब्बल 25 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग नेटवर्क उभे करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
‘पर्वतमाला’ या योजनेची घोषणा
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान गतीशक्ती योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत देशातील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे 25 हजार किलोमीटरने वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय मेट्रो ट्रेनचे जाळे उभारण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे निर्मला सीतारामण यांनी सांगितले. तसेच पुढच्या तीन वर्षांत 400 वंदे भारत रेल्वे सुरु होणार असून रेल्वेचे जाळे विकसित करण्याची घोषणा त्यांनी केली. दरम्यान, देशातील डोंगराळ भागात रस्त्यांचे जाळे विस्तारण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी ‘पर्वतमाला’ या योजनेची घोषणा केली आहे. याअंतर्गत दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये रस्ते बांधण्याचे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. हे उपक्रम पीपीपी अर्थात खासगी आणि सार्वजनिक भागीदारीच्या तत्वावर राबवले जाणार आहेत. देशातील मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी काम करण्यात येणार असून 112 जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या जिल्ह्यातील तालुक्यांच्या विकासासाठी, गावांना रस्त्याने जोडण्यासाठी विलेज इन्फ्रास्ट्रक्चर योजना आणण्यात आली आहे. यासाठी सध्याच्या योजनांचं एकत्रीकरण केले जाईल असे अर्थमंत्र्यांनी सांगितले त्यासोबतच देशातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. यामधून देशात 60 लाख नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील असं निर्मला सीतारामण यांनी सांगितले.
(हेही वाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ : आयकर आकारणीत काहीही बदल नाही!)
Join Our WhatsApp Community