माजी नगरसेवकांना उशिरा सुचले शहाणपण, म्हणतात अर्थसंकल्प बनवताना एनजीओ, एएलएमच्या सूचना घ्या

मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात आल्यानंतर रस्त्यांवर आलेल्या नगरसेवकांना आता जनता आठवू लागली असून प्रशासकांनी मंजूर केलेले प्रस्ताव महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्याच्या मागणीनंतर आता विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी महापालिकेचा अर्थसंकल्प माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, एएलएम आदींच्या सूचना व अभिप्राय मागवून बनवण्याची मागणी केली. त्यामुळे नगरसेवक असताना ही मागणी न करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षांच्या नगरसेवकांना अस्तित्वच संपुष्टात आल्यानंतर जनता आठवू लागल्याने ही मागणी म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असेच बोलले जात आहे.

( हेही वाचा : म्हाडा टेंडर प्रकरण : कंत्राटदारावर गोळीबार करणाऱ्या ४ हल्लेखोरांना अटक )

मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, समाजवादी पक्षाचे माजी गटनेते रईस शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी गटनेत्या राखी जाधव यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना निवेदन देऊन महानगरपालिका सद्यस्थितीत अस्तित्वात नाही. मुंबई महानगरपालिकेचे कामकाज मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या नियमानुसार चालते. मुंबई महानगरपालिकेत सध्या प्रशासक नियुक्त असून, लोकप्रतिनिधी नसल्याने सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प हा केवळ प्रशासनाच्यास्तरावर सादर केला जाणार असल्याचे म्हटले आहे.

महानगरपालिकेमध्ये कोणीही लोकप्रतिनिधी नसल्याने माजी नगरसेवक तसेच मुंबईतील विविध विभागामधील एन.जी.ओ तसेच वेगवेगळया संघटना आणि विभाग स्तरावरील ए. एल. एम यांच्यामार्फत विविध विभागातील कामांचे अभिप्राय व सुचना घेऊन अर्थसंकल्प बनविणे आवश्यक आहे.

अर्थसंकल्प मुंबईतील सामान्य नागरिकांना अवगत करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर एक नविन पोर्टल ओपन करुन त्यामध्ये सन २०२३-२०२४ या अर्थसंकल्पाची माहिती माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, एन.जी.ओ. आणि विविध विभागातील स्तरावरील ए. एल. एम. संघटना यांच्यामार्फत विभागातील कामांचे अभिप्राय व सुचना मागवून अर्थसंकल्प तयार करण्यात यावा तसेच महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नविन पोर्टल ओपन करुन अर्थसंकल्प सादर करण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली.

विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात नगरसेवकांचा कोणताही सहभाग नसल्याने आता त्यांचा जनतेची चिंता भासू लागली आहे. परंतु मागील पाच वर्षांत अशाप्रकारे कोणतीही मागणी न करणाऱ्या या महापालिकेतील माजी नगरसेवकांना आता का आठवण झाली असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here