मुंबई दूध उत्पादक संघाचे (एमएमपीए) अध्यक्ष सी.के. सिंग यांनी एक महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे. येत्या १ मार्चपासून मुंबई दूध उत्पादक संघाने म्हशीच्या दूध दरात ५ रुपये प्रतिलिटरने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई दूध उत्पादक संघाचे (एमएमपीए) अध्यक्ष सी.के. सिंग म्हणाले की, शहरात म्हशीचे दूध तीन हजारहून अधिक विक्रेत्यांकडून विकले जाते. सध्या त्याची किंमत ८० रुपये प्रति लीटर इतकी असून १ मार्चपासून ते ८५ रुपये प्रति लीटर दराने विकले जाईल. ही दरवाढ ३१ ऑगस्टपर्यंत लागू असणार आहे. याआधी सप्टेंबर २०२२ मध्ये वाढ करण्यात आली होती. तेव्हा दुधाची किंमत ७५ वरून ८० रुपये अशी केली होती. आता या नव्या दरवाढीमुळे हे दर ८५ ते ९० रुपयांच्या घरात जाऊ शकतात.
मुंबईत दरदिवशी ५० लाखांपेक्षा जास्त लीटर म्हशीच्या दुधाची विक्री
दुभत्या जनावराच्या खाद्यांचे दर १५ ते २५ टक्के वाढले आहेत. याशिवाय गवताचे दरही वाढले असून त्यामुळे दूधाचे दरही वाढवायला हवेत, अशी मागणी सदस्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर दूध दरवाढीचा निर्णय नुकताच दूध उत्पादक संघाच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. मुंबईत दरदिवशी ५० लाखांपेक्षा जास्त लीटर म्हशीच्या दुधाची विक्री होते. त्यापैकी ७ लाखांहून अधिक लीटर दूध संघाच्या माध्यमातून विकले जाते.
(हेही वाचा – मुंबईतील ६ टक्केच नागरिक पुरेशा फळे – भाज्या खातात, तर १२ टक्के मुंबईकर लठ्ठ; जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल)