पश्‍चिम द्रुतगती महामार्ग व जोगेश्‍वरी-विक्रोळी जोडरस्ता जंक्शन जवळ भुयारी मार्ग बांधा!

119

पश्‍चिम द्रुतगती महामार्ग व जोगेश्‍वरी विक्रोळी जोडरस्ता जंक्शन येथून रहिवाशांना तसेच पादचार्‍यांना अपघात विरहीत रस्ता ओलांडणे शक्य व्हावे यासाठी मेट्रो सिनेमा लगतच्या उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाच्या धर्तीवर पश्‍चिम द्रुतगती महामार्ग व जोगेश्‍वरी-विक्रोळी जोडरस्ता जंक्शनवर भुयारी मार्ग बांधण्यात यावा, असे पत्र जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यांना पाठवले आहे.

एमएमआरडीए मेट्रो मार्गिका क्रमांक ६ स्वामी समर्थ नगर अंधेरी (पश्‍चिम) ते कांजुर मार्ग व मेट्रो मार्गिका क्रमांक ७ अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या दोन मेट्रो मार्गिकेचे काम सध्या या ठिकाणी सुरू असून जोगेश्‍वरी (पूर्व) पश्‍चिमेस जोडणार्‍या जोगेश्‍वरी उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर या ठिकाणी रस्ते वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या दोन्ही मेट्रो रेल्वेची बांद्रेकरवाडी व एमएमआरडीए कॉलनी येथे रेल्वे स्थानक होणार आहेत. या महामार्गालगत कामगार वस्ती ही तुलनात्मकदृष्या जास्त असून पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर वसलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ट्रामा केअर सेंटर असल्याने तसेच शेजारी अस्मिता विद्यालय ही शाळा असल्याने रहदारी ही जास्त होत आहे. या महामार्गालगतच प्रतापनगर, शिवटेकडी, रामवाडी, मजास गाव टेकडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वसली आहे. येथील रहिवाशांना महामार्गावरुन भरधाव जाणार्‍या गाड्यांच्या मधून जीवावर उदार होऊन रस्ता ओलांडावा लागतो.

( हेही वाचा : बेस्ट कर्मचारी कोविड भत्त्यापासून वंचित! )

भुयारी मार्ग नसल्याने हा जोडरस्ता अपघाताचे केंद्र

मुंबई शहरातील मेट्रो सिनेमा येथील चारही दिशेस रस्ते जात असल्याने येथून पादचार्‍यांना अपघात विरहीत रस्ता ओलांडता यावा यासाठी या ठिकाणी भुयारी मार्गाची निर्मिती करुन रहदारी सुरक्षित करण्यात आली आहे. परंतु पश्‍चिम द्रुतगती महामार्ग ते जोगेश्‍वरी विक्रोळी जोडरस्ता जंक्शन या ठिकाणी अशाप्रकारे भुयारी मार्ग नसल्याने हे जंक्शन अपघाताचे केंद्र बनत चालले आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती पाहता भुयारी मार्गाची नितांत आवश्यकता असल्याने वायकर यांनी २०१३ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता तसेच सह सचिव, विकास विभागाचे कार्यकारी अभियंता विभाग क्र.४, अंधेरी (पश्‍चिम) यांच्याकडे पत्रव्यवहारही केला आहे. नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी प्रथम प्राधान्य देत येथील प्रस्तावित भुयारी मार्गास आवश्यक ती परवानगी मिळावी व मेट्रो मार्गिकेच्या कामाबरोबरच या कामाला प्राधान्य देऊन, नागरिकांना दिलासा द्यावा, असे पत्र आमदार रविंद्र वायकर यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यांना पाठविले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.