चित्रपट फायनान्सर आणि प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक युसूफ लकडावाला याला ईडीने शुक्रवारी, २८ मे रोजी अटक केली आहे. लकडावाला याला ईडीने गुरुवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, दरम्यान मनी लॉन्डरिंगमध्ये शुक्रवारी त्याला ईडीने अटक केली आहे. युसूफ लकडावाला याच्याविरूद्ध २०१९ मध्ये मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल होता, त्यात त्याला अटक देखील झाली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर ईडीने या गुन्ह्याच्या तपास सुरु केला होता.
युसूफ लकडावाला जामिनावर बाहेर होता!
हैद्राबाद येथील एका नवाबाच्या खंडाळा येथील चार एकर जमिनीचे बोगस दस्तऐवज तयार करून जमीन हडपण्याच्या संदर्भात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत युसूफ लकडावाला याच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी १२ एप्रिल २०१९ रोजी युसूफ लकडावाला याला अहमदाबाद येथून आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. या गुन्ह्यात युसूफ लकडावाला हा सध्या जामिनावर बाहेर होता.
(हेही वाचा : वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट! महेश मांजरेकर दिग्दर्शन करणार!)
मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल!
आर्थिक गुन्हे शाखेत दाखल असलेल्या गुन्ह्यात ईडीकडून चौकशी सुरु असताना यामध्ये मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याचा तपास सुरु होता. गुरुवारी ईडीने युसूफ लकडावाला त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी सुरु होती. दरम्यान शुक्रवारी लकडावाला याला ईडीने अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community