पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून 5 जण ठार!

128

येरवडा येथील शास्त्रीनगर परिसरात एका बेसमेटमध्ये काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर स्लॅबला लागणारी लोखंडी जाळी कोसळून 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. घटनास्थळी येरवडा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

16 एमएम गज शरीरात घुसले

शास्त्रीनगर परिसरात वाडिया यांच्या एका इमारतीच्या शेजारी बेसमेटचे काम करण्यात येत आहे. दरम्यान बेसमेंटला स्लॅब टाकण्याची तयारी केली जात होती. यादरम्यान त्यावर स्लॅब टाकण्यासाठी लोखंडी जाळीचे कडे करण्यात आले होते. 16 एमएम गजाचे ही भली मोठी जाळी होती. दरम्यान, रात्री काही कामगार या बेसमेटमध्ये काम करत होते. तर ही जाळी त्याठिकाणी उभी करून ठेवण्यात आली होती. मात्र अचानक ही जाळी निसटली आणि या कामगारांच्या अंगावर पडली. लोखंडी जाळी असल्याने जबर मार लागला. तर काही गज या कामगारांच्या शरीरात घुसले होते.

(हेही वाचा “…मुख्यमंत्री महाविकास आघाडीत आल्यानं बिघडले”)

गज कापून कामगारांची सोडवणूक

हा प्रकार घडताच अग्निशमन दलाला माहिती देऊन बोलविण्यात आले. त्यांनी कटरच्या सहाय्याने जाळीचे गज कापून यात अडकलेल्या कामगारांना रात्री उशिरापर्यंत बाहेर काढण्याचे काम सुरू होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सर्व कामगारांना बाहेर काढून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यात तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला. तर दोन किरकोळ जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. रात्र असल्याने या कामगारांची नावे समजू शकली नाहीत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.