बारावी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी आता अजून दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघेही बुलढाण्यातही लोणार तालुक्यातील खासगी शाळेतील शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची संख्या आतापर्यंत सातवर पोहोचली आहे. तसेच, आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. शकील मुनाफ, आणि अंकुश पृथ्वीराज चव्हाण अशी ताब्यात घेतलेल्या दोन शिक्षकांची नावे आहेत.
बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजामध्ये बारावीचा गणिताचा पेपर परीक्षा सुरु होण्याआधीच अर्ध्या तास फुटल्याची चर्चा आहे. गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. पेपरफुटीच्या मुद्द्यावर विधानसभेतही चर्चा झाली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सभागृहात मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
( हेही वाचा: धक्कादायक: बुलढाण्यानंतर मुंबईतही बारावीचा पेपर फुटला )
बुलढाण्यात फुटलेला पेपर हा विज्ञान शाखेच्या गणिताचा पेपर
बारावी बोर्डाचा गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पाने सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरुन व्हायरल झाली होती. याबाबतची सर्व वृत्तवाहिन्यावरुन प्रसिद्ध झाली. यादरम्यान, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कुठेही आढळून आलेले नव्हते. यामुळे इयत्ता बारावीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाचा सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले होते. मात्र, मुंबईतील विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये गणिताच्या पेपरची काही पाने आढळल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.