अलिबाग समुद्र किनाऱ्यावर धुलीवंदनाच्या दिवशी बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला होता. आता ही स्पर्धा बेकायदेशीरपणे आयोजित करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पर्धेसंदर्भात कोणतीही परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे आयोजकांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतिशय भव्य स्वरुपात ही स्पर्धा पार पडली होती. तिथे हजारो लोक या स्पर्धेसाठी अलिबागच्या मुख्य समुद्र किनाऱ्यावर दाखल झाले होते. मात्र स्पर्धेच्या अंतिम फेरीदरम्यान एक बैलगाडी उधळली आणि ती थेट प्रेक्षकांमध्ये शिरली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. स्पर्धेला गालबोट लागले. दोन जणांचे बळी गेल्यानंतर आता या स्पर्धेचे बेकादेशीरपणे आयोजन करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. बैलगाडी शर्यतींच्या आयोजनासाठी लागणारी जिल्हाधिकारी यांची परवानगी आयोजकांनी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आयोजकांविरोधात विनापरवाना स्पर्धेचे आयोजन करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लघन करणे, कोणत्याही उपाययोजना न करता त्या वेगाने पळविणे, बैलांना पळविण्यासाठी काठीने मारून क्रुरतेने वागणूक देणे आणि अपघात होऊन दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे, यासारख्या आरोपांखाली आयोजकांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा पुलवामा हल्ल्यातील वीर पत्नींना मारहाण प्रकरण; सचिन पायलट यांचा घरचा आहेर)