प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर मुंबईतील बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज बांधण्यासाठी मुंबईत अखेर दुसरे रडार शुक्रवारपासून मुंबईकरांच्या सेवेला हजर होत आहे. गोरेगाव येथील वेरावली येथे सी बॅण्डच्या ऱडारचे शुक्रवारी, 14 जानेवारी रोजी वेधशाळा स्थापनेच्या दिनानिमित्ताने पृथ्वी व विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मुंबईसह दिल्ली, लेह आणि चेन्नईतही एकाच दिवशी चार रडार कार्यान्वित होणार आहे.
2005 च्या जलप्रलयानंतर आणखी एका रडारची होती गरज
मुंबईत अगोदरच कुलाबा वेधशाळेनजीक एस बॅण्डचे रडार कार्यान्वित असून, ते मुख्यत्वे वादळ तसेच पावसाच्या अंदाजासाठी वापरले जात होते. मात्र २००५ साली मुंबईतील जलप्रलयानंतर मुंबईतील हवामानाच्या अंदाजासासाठी अजून एका रडाराची तजवीज करण्याचा विचार केंद्रीय तसेच राज्य पातळीवर झाला होता. त्यानंतर कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सी बॅण्डचे रडार मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार आहे. या रडारपेक्षाही जागेचा मोठा प्रश्न वेधशाळा आणि पालिका प्रशासनासमोर होता. कुलाब्यात अगोदरच एक रडार असताना पश्चिम उपनगरांत या रडारसाठी पालिकेने विशेष करुन मोठी शोध मोहीमही घेतली. मात्र जागेच्या प्रश्नाअभावी रडार लावण्यामागे वेधशाळा आणि पालिकेला मोठी कसरत करावी लागली. यासह मुंबईतील हवामानाच्या अंदाजासाठी मुंबई महानगर परिसरात अलिबाग तसेच अजून एका ठिकाणी वेगळ्या बॅण्डचे रडार लावण्याची वेधशाळेने घोषणा केली होती. मात्र याबाबतीत अधिक माहिती वेधशाळा अधिका-यांकडून मिळू शकली नाही.
(हेही वाचा विदर्भात यलो अलर्ट, तर नाशिक सर्वाधिक थंड!)
रडारचे विविध प्रकार
वातावरणातील बदलांच्या अंदाजासाठी वेगवेगळ्या बॅण्डचे रडार कार्यान्वित वापरले जातात. मुंबईतील कुलाबा परिसरातील एस बॅण्डचा रडार वादळांच्या माहितीसाठी मुख्यत्वे वापरला जातो. सी बॅण्ड आणि एक्स असे अजून दोन प्रकार बॅण्डचे आहेत. त्यापैकी सी बॅण्डचा रडार गोरेगाव येथील वेरावली येथे बसवण्यात आला आहे, तर एक्स बॅण्डच्या रडारसाठी अलिबाग हे जवळपास निश्चित झाले आहे. अजून एका रडारबाबत वेधशाळा अधिका-यांनी माहिती देणे टाळले.
गोरेगाव येथील सी बॅण्ड रडारची वैशिष्ट्ये
- इस्त्रेक आणि इस्त्रोमधील रडार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली या रडारची निर्मिती झाली आहे.
- पावसाच्या अचूक अंदाजासाठी सी बॅण्डचा रडारचा वापर होईल. या रडारमुळे मुंबईनजीकच्या ४५० किलोमीटर भागांतील वातावरणातील बदल वेधशाळेला पाहता येतील
- मेक इन इंडिया योजनेंतर्गत चेन्नईतील बनवलेले सी बॅण्ड रडार हे संपूर्णतः भारतीय बनावटीचे रडार आहे.
- प्रत्येक तीन तासांमधील मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटाबाबत या रडारच्या उपयोगातून माहिती मिळेल