मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून आता संशयित क्षयरोग रुग्ण(टीबी) रुग्णांचा शोध घेण्याची मोहिम राबवण्यात येत असून या मोहिमेतंर्गत संशयित रुग्णांचा शोध घेताना ज्या यापूर्वी कोविडची बाधा झाली आहे, त्यांची सर्वप्रथम तपासणी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचे निर्देशच आशा वर्कर आणि आरोग्य सेविकांना दिले आहेत.
( हेही वाचा : अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचा पडदा कधी उघडणार, आधी ३६ वर्षे पडीक, १७ महिन्यांपासून तिसऱ्या घंटेच्या प्रतीक्षेत! )
मागील दोन वर्षांत कोविडच्या आजाराचा संसर्ग वाढल्यानंतर, याचा बाधा अनेक रुग्णांना झाली. त्यामुळे कोविडची बाधा झालेले अनेक रुग्ण बरे झाले असून काही रुग्ण मृत्यू पावले. परंतु या कोविडच्या काळात क्षयरोग रुग्णांची संख्या कमी झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेच कुठेतरी कोविडची बाधा झालेल्या अनेक रुग्णांनी क्षयरोगाच्या आजाराची माहिती दिली नाही, असे आरोग्य विभागाला वाटत असून कोविडची बाधा झालेल्या अनेक रुग्णांमध्ये क्षयरोगासह उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच हृदयविकाराच्या आजारांचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्यामुळे अशाप्रकारे आजारांच्या रुग्णांना यापूर्वी कोविडची बाधा झाली आहे का किंवा कसे याबाबतची माहिती संकलित करण्याचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून संशयित क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्याची मोहिम राबवली जात आहे. यामध्ये ५० लाख लोकसंख्यांमधून संशयित रुग्णांचा शोध घेतला जाणार असून १ लाख नागरिकांमधून साडेतीन हजार संशयित रुग्ण शोधण्याचे लक्ष्य आरोग्य सेविकांना देण्यात आले आहे. या संशयित क्षयरोग रुग्णांच्या शोध मोहिमेमध्ये ज्या लोकांना यापूर्वी कोविडची बाधा झाली आहे, अशा रुग्णांची प्राधान्याने तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड काळात क्षयरोग रुग्णांची संख्या कमी दिसून आली आहे. त्यामुळे ज्यांना यापूर्वी कोविड झाला आहे, त्याची प्रथम तपासणी करून त्यानंतर इतरांची तपासणी करून संशयित क्षयरोग रुग्णांचा शोध घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community