महापालिका मुख्य लिपिक पदाच्या परीक्षा रद्द करा! कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे 

महापालिकेच्यावतीने घेण्यात येणारी ही परीक्षा विहित वेळेत घ्यायला हवी, असा कोणताही  नियम नसून यापूर्वीच्या परीक्षा प्रशासनाला वाटेल तेव्हाच घेतल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

76

मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहायक (प्रमुख लेखापाल खाते) या पदांसाठी  खात्यांतर्गत  घेण्यात येणारी लेखी परीक्षा रद्द करण्याची मागणी आता जोरात होवू लागली. ही परीक्षा रद्द करण्यासाठी विविध पक्ष आणि कामगार संघटनांनी विरोध दर्शवलेला असतानाच आता परीक्षार्थींनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घालून ‘आम्हाला न्याय द्या’, अशी मागणी केली आहे.

२,५३३ इच्छुक व पात्र उमेदवारांची परीक्षा!

मुख्य लिपिक पदाच्या परीक्षेसाठी २,१४० आणि वरिष्ठ लेखा परीखा व लेखा सहायक पदाच्या परीक्षेसाठी  ३९३ अशी एकूण २,५३३ इच्छुक व पात्र उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी १६ ते रविवार १८ एप्रिल २०२१ या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. पण ही परीक्षा नियोजित तारखेलाच घेणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून ही परीक्षा रद्द करण्यासाठी परीक्षेला बसलेल्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच साकडे घातले आहे.

(हेही वाचा : मुंबईत कोरोना पुन्हा वाढला… रविवारी ९ हजार ९८९ रुग्ण!)

एमपीएससीच्या धर्तीवर परीक्षा रद्द करण्याची मागणी

सद्यस्थिती मुंबईत मोठ्याप्रमाणात कोरोनाचा प्रार्दुभाव पसरलेला असून अशा परिस्थितीत पूर्ण तयारी झालेली असतानाही एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याात आली आहे. त्याप्रमाणे महापालिकेकडून होणारी मुख्य लिपिक पदाची होणारी परीक्षा पुढे ढकलण्यासाठीचे आदेश देवून आम्हा कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. या मुख्य लिपिक पदाच्या परीक्षेला सुमारे २,७०० कर्मचारी बसलेले असून यामध्ये कोरोना बाधित रुग्ण आहेत. पण् परीक्षेला बसायला मिळावे म्हणून काही जण आरटीपीसीआर चाचणी करून घेत नाही. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्यास परीक्षेला बसलेल्या इतर कर्मचाऱ्यांनाही याची लागण होईल. तसेच बाधित असल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत तर काही होम क्वारंटाईन आहेत. तर अनेक कर्मचारी हे बाधित रुग्ण आढळून आल्याने सील केलेल्या इमारतीत राहत आहेत. त्यामुळे त्यांना परीक्षा देणे शक्य नाही, असे या  निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या सर्व कारणांमुळे जे कर्मचारी परीक्षा देणार नाही, ते या लाभापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे १५० कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन सध्या मुख्यमंत्र्यांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह गटनेत्यांना देण्यात आले आहे.

परीक्षा रद्द करण्याची सर्वपक्षीय मागणी!

महापालिकेच्यावतीने घेण्यात येणारी ही परीक्षा विहित वेळेत घ्यायला हवी, असा कोणताही  नियम नसून यापूर्वीच्या परीक्षा प्रशासनाला वाटेल तेव्हाच घेतल्या आहेत. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलल्या म्हणून काहीही फरक पडणार नाही, असेही या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनीही ही परीक्षा रद्द व्हावी, म्हणून आुयक्तांना निवेदन दिले आहे. तसेच बृहन्मुंबई महापालिका कर्मचारी अधिकारी महासंघाचे सरचिटणीस संजय बापेरकर यांनीही मुख्यमंत्र्यांसह आयुक्तांना पत्र लिहून ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेनेही ही परीक्षा रद्द करण्याची भूमिका घेत मागणी केली आहे. त्यामुळे आता एकूणच ही परीक्षा रद्द करण्यासाठी कामगार संघटना आणि कर्मचाऱ्यांकडून दबाव वाढू लागला असून आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.