Carnac Bridge : मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील कर्नाक पुलाचा पहिला गर्डर चढला

67
Carnac Bridge : मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील कर्नाक पुलाचा पहिला गर्डर चढला
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱ्या १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाची (Carnac Bridge) बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे. या प्रकल्प अंतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागावर ७० मीटरपर्यंत सरकविण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. रेल्‍वे प्रशासनाने जाहीर केलेल्‍या ‘ब्‍लॉक’ नुसार, रविवरी १३ ऑक्टोबर २०२४ रोजी मध्‍यरात्री १२.२५ ते पहाटे ५.४५ या दरम्‍यान आणि सोमवारी १४ ऑक्टोबर २०२४ मध्यरात्री १२.३० ते ३.३० या कालावधीत लोखंडी तुळई यशस्वीपणे सरकविण्‍यात आली आहे.

ही महाकाय तुळई दक्षिण बाजूस सरकविण्याचे काम येत्या आठवड्यात पूर्ण होईल. तसेच, समांतरपणे पुलाच्या पश्चिमेकडील पोहोच मार्गाचे बांधकाम येत्या आठवड्यातच सुरू करण्‍यात येईल. पुलाची दुसरी तुळई स्‍थापित करण्‍याची कार्यवाही डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत पूर्ण करण्‍याकामी प्रयत्‍न केला जाणार आहे. तुळई सरकविण्याची कार्यवाही तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक होते. त्यासाठी विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या परवानगीनंतर व पुढील रेल्वे ‘ब्लॉक’ मिळाल्यानंतर तुळई स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मध्य रेल्वेसोबत समन्वय साधण्यात येत आहे. (Carnac Bridge)

(हेही वाचा – अभिनेते Atul Parchure यांचे निधन)

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या पूल विभागाने मध्य रेल्वे प्रशासनासह योग्य समन्वय साधून ही कार्यवाही पूर्ण केली आहे. प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (पूल) शहर राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी योग्य नियोजन करून तुळई पुढे सरकविण्याची कार्यवाही पार पाडली. रेल्वे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कामाची जोखीम व तांत्रिक बाबी तपासून, त्याचप्रमाणे रेल्वे वाहतूक व वीज पुरवठा या दोन्ही घटकांमध्ये खंड (ब्लॉक) मिळाल्यानंतर तुळई स्थापनेचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार व मध्य रेल्वेने निर्देश केल्याप्रमाणे मेसर्स राईट्स लिमिटेड यांच्या तांत्रिक पर्यवेक्षण अंतर्गत तुळई सरकविण्‍याचे कामकाज पूर्ण करण्यात आले आहे. (Carnac Bridge)

दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. पुलाच्‍या बांधकामासाठी तुळईचे सुटे भाग मुंबईत आल्यावर जोडकाम करून पुलाची एक तुळई बांधणी पूर्ण करण्यात आली. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद बंदर रेल्वे मार्गाच्या पूर्व दिशेला तुळई बांधणी व पुलाचा पाया उभारण्याचे काम करण्यात आले. सुमारे ७० मीटर लांब आणि ९.५० मीटर रुंद आकाराच्या या तुळईचे वजन सुमारे ५५० मेट्रिक टन आहे. तुळई बसवण्यासाठी रेल्वे रुळांलगत तुळई पूर्णतः अधांतरी (कॅण्‍टीलिवर) होती. त्यानुसार तुळई पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकविण्यात आली. (Carnac Bridge)

(हेही वाचा – Ashish Shelar मतदारसंघ बदलणार?)

रेल्‍वे प्रशासनाने या कामकाजासाठी दोन दिवसीय ‘ब्‍लॉक’ जाहीर केला होता. त्‍यानुसार, रविवार, १३ ऑक्टोबर २०२४ रोजी मध्‍यरात्री १२.२५ ते पहाटे ५.४५ या दरम्‍यान पुलाची तुळई सुमारे ७० मीटर पैकी ५८ मीटर अंतरापर्यंत पार करण्‍यात आली. तर, रविवारी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी मध्यरात्री १२.३० ते ३.३० या कालावधीत उर्वरित अंतरापर्यंत तुळई यशस्वीपणे सरकविण्‍यात आली आहे. या कार्यवाहीनंतर, उर्वरित कामे देखील पूर्णत्वास नेण्यात आली आहेत. आता, तुळई स्थानांतराची (साईड शिफ्टिंग) प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ही महाकाय तुळई दक्षिण बाजूस ९.५० मीटर अंतरापर्यंत सरकविण्याचे काम येत्या आठवड्यात पूर्ण होईल. तसेच, समांतरपणे पुलाच्या पश्चिमेकडील पोहोच मार्गाचे बांधकाम येत्या आठवड्यातच सुरू करण्‍यात येईल. तसेच, पुलाची दुसरी तुळई स्‍थापित करण्‍याची कार्यवाही डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत पूर्ण करण्‍याकामी महानगरपालिका प्रयत्‍नशील आहे. (Carnac Bridge)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.