Carnac Railway Flyover : अडचणींवर मात करत केले काम, आयुक्तांनी केला अभियंत्‍यांचा सत्कार

39
Carnac Railway Flyover : अडचणींवर मात करत केले काम, आयुक्तांनी केला अभियंत्‍यांचा सत्कार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि. मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील दोन तुळ्या (गर्डर) रेल्‍वे भागात सरकविण्‍याची कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल महानगरपालिकेच्या पूल विभागातील अभियंत्‍यांचा महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्‍या हस्‍ते प्रशस्‍तिपत्र प्रदान करुन सत्‍कार करण्‍यात आला. कर्नाक रेल्वे उड्डाणपूल उभारणी कामात महानगरपालिकेच्यावतीने रेल्वे प्रशासनासोबत समन्‍वय साधण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे उपप्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे, कार्यकारी अभियंता (पूल) (निवृत्त) सखाराम जाधव, सहायक अभियंता कुणाल वैद्य, दुय्यम अभियंता अभिषेक देवळेकर यांचा सत्‍कारार्थींमध्‍ये समावेश आहे. मुंबई महानगराच्या विकासात अभियंत्‍यांची कामगिरी अभिमानास्‍पद असल्‍याचे गगराणी यांनी यावेळी नमूद केले. (Carnac Railway Flyover)

(हेही वाचा – BMC Budget 2025-26 : मुदतठेवी ८३ हजार कोटींच्या, पण खर्च करता येणार फक्त ३९,५४३ कोटी रुपयेच)

या सत्काराप्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्‍हणाले की, मुंबई महानगराच्‍या विकासात अभियंत्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मुंबईकरांचा प्रवास अडथळाविरहित आणि सुखकर करणारे पूल, रस्‍ते विभागातील अभियंता, कर्मचारी-अधिकारी म्‍हणजे महानगरपालिकेचा कणा आहे. मुंबईच्‍या भौगोलिक परिस्थितीत दैनंदिन कामकाज करणे आव्‍हानात्‍मक आहे. अनेक अडचणी आणि आव्‍हानांवर मात करत अभियंते कामकाज यशस्‍वीपणे करत आहेत, असे उद्गार गगराणी यांनी व्यक्त केले. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर, विशेष कार्य अधिकारी (महानगरपालिका आयुक्‍तांचे कार्यालय) चंद्रशेखर चोरे, प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते यावेळी उपस्थित होते. (Carnac Railway Flyover)

(हेही वाचा – कोथरुडमधील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी Chandrakant Patil यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे निधीची मागणी)

दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्प अंतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूची लोखंडी तुळई दिनांक १९ ऑक्‍टोबर २०२४ रोजी आणि उत्तर बाजूची लोखंडी तुळई दिनांक २६ ते ३० जानेवारी २०२५ रोजी रेल्‍वे भागात सरकविण्‍याची कार्यवाही यशस्‍वीरित्‍या पूर्ण करण्‍यात आली आहे. महानगरपालिका पूल विभागातील अभियंते आणि मध्य रेल्वे प्रशासन यांनी समन्वय साधून, तांत्रिक अडचणींवर वेळोवेळी मात करत तुळई सरकविण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार यांचे यामध्ये उल्लेखनीय योगदान आहे. (Carnac Railway Flyover)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.