सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रायोगिक तत्वावर हमरस्त्यावरचे पाणी एकत्र करून ते जमिनीत मुरवण्याचे शास्त्रशुद्ध काम केले आहे. ते अधिक मोठ्या प्रमाणावर करावे, जेणेकरून राज्याला आणि देशाला पथदर्शक होईल, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी व्यक्त केले.
लातूर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल, यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले, लातूर जिल्ह्यात सोयाबीन मोठ्या प्रमाणात होते. त्याची प्रक्रियाही इथेच होते, हे कौतुकास्पद आहे. काळा सोयाबीन हा स्वादासाठी आणि प्रोटीनयुक्त असतो. त्यामुळे या पीकाचा प्रयोग जिल्हाभर राबवण्यात यावा. लातूर जिल्ह्यात वनाच्छादित क्षेत्र कमी आहे ते वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली.
दिव्यांगांच्या कल्याणासाठी व्यापक प्रयत्न करा
उमंग इन्स्टिट्यूट ऑफ ऑटीझम अँड मल्टीडिसेबिलिटी रिसर्च सेंटर लातूर येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली. नावीन्यपूर्ण उमंग सेंटर उभे केल्याद्दल कौतुक करून, हे सेंटर जास्तीत जास्त प्रभावीपणे चालवण्यासाठी व दिव्यांगांच्या कल्याणासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. उमंग हे राज्याला दिशा देणारे सेंटर आहे. त्यात दिव्यांग मुलांसाठी चालवण्यात येणाऱ्या न्यूरोलॉजिकल ट्रीटमेंट, अर्ली इंटर्वेन्शन, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, बिहेवियर थेरपी, सायकॉलॉजिकल थेरेपी, फिजिओथेरेपी, स्पेशल एज्युकेशन व विशेष सेन्सरी पार्क या सर्व ट्रीटमेंट व थेरपीची प्रत्यक्ष पाहणी केली.
Join Our WhatsApp Community