महापालिकेच्या दवाखान्यांसह रुग्णालयांमध्ये केस पेपर सुविधा निशुल्क?

महापालिका रुग्णालयांसह आरोग्य केंद्र आणि दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सर्वप्रथम केस पेपर बनवणे बंधनकारक आहे. या केस पेपरच्या आधारे रुग्णांवर पुढील उपचार केले जातात. परंतु या केस पेपरसाठी रुग्णांकडून प्रत्येकी दहा रुपये आकारले जात असून भविष्यात या केस पेपरसाठी आकारले जाणारे पैसे टप्प्याटप्याने बंद केले जाणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात दवाखान्यांमधून केस पेपरसाठी आकारले जाणारे शुल्क बंद करून निशुल्क सेवा देण्याचा विचार प्रशासन करत असल्याची माहिती मिळत आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे कामकाज होणार विनाकागद

मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह विशेष रुग्णालये, आरोग्य केंद्र, प्रसुतीगृह तसेच दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सर्वप्रथम केस पेपर भरुन द्यावा लागतो. या केस पेपरसाठी प्रत्येकी दहा रुपये आकारले जातात.  त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांकडून केस पेपरसाठी आकारले जाणारे दहा रुपयांचे शुल्क बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई महापालिकेच्यावतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आणि टॅब आधारित पद्धतीने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा आणि वितरण तसेच संदर्भित केलेल्या निदान सुविधा यांचा तपशिल नोंदविण्यात येत आहे. यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे कामकाज हे विनाकागद अर्थात पेपरलेस पद्धतीने आणि पर्यायाने पर्यावरण पूरक होत आहे.

त्यामुळे दवाखान्यांसह रुग्णालयांमधून केस पेपरसाठी आकारले जाणारे शुल्क न आकारण्याचा निर्णय घेण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासन विचार करत आहे. या केस पेपरसाठी दहा रुपयांचे आकारले जाणारे शुल्क वसूल करण्यासंदर्भात महापालिकेच्या मंजुरीने केला जाणारा ठराव रद्द करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये याबाबतचा निर्णय घेऊन टप्प्याटप्प्याने केस पेपरसाठी आकारले जाणारे शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याशी संपर्क साधला असता. सध्या अशाप्रकारचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. परंतु हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यामध्ये केस पेपरचे शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व टॅब आधारीत पध्दतीने निदान सुविधेचा तपशिल ठेवण्याची प्रणाली इतर दवाखान्यांमध्ये सुरु केली जाणार आहे. या दवाखान्यांमध्ये मिळणारा प्रतिसाद व सर्व प्रकारचा अभ्यास करून विशेष रुग्णालयांमध्ये केस पेपर पध्दत ठेवली जावा तथा त्यासाठी आकारले जाणारे शुल्क घ्यावे याबाबतचा विचार केला जाईल. मात्र, सध्या हा निर्णय दवाखान्यांपुरताच सिमित ठेवण्याचा विचार होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here