एसटी कर्मचारी अखंडपणे आपली सेवा बजावत असले, तरी या कामाचा मोबदला म्हणून महिन्याकाठी निश्चित असलेला पगार मात्र त्यांना वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र एसटी महामंडळाने बँकांच्या सहाय्याने कॅश क्रेडीटचा पर्याय स्वीकारल्यास कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळेल. त्यामुळे तात्पुरता उपाय म्हणून हा पर्याय स्वीकारला पाहिजे, असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.
याआधीही केला होता प्रयोग
एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण झाले पाहिजे, त्याशिवाय कायम स्वरुपी तोडगा निघणे अवघड असून तात्पुरता उपाय म्हणून कॅश क्रेडिटचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. काही वर्षांपूर्वी महामंडळ आर्थिक अडचणीत आल्यावर पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया व एसटी को ऑप. बँक या बँकेतून तसा प्रयोग एक वेळा स्वीकारण्यात सुद्धा आला होता, अशी माहिती मिळते. काही कालावधीसाठी याच बँकांकडून कर्ज सुद्धा घेण्यात आले होते, असेही समजते.
(हेही वाचाः दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ता द्या!)
असा होणार फायदा
कॅश क्रेडिटसाठी गाड्या, गोडाऊनमधील चालू स्थितीतील साठवलेले सामान, टायर व चॅशी गहाण ठेवाव्या लागतात. सरकारने हमी घेतल्यास सुद्धा कॅश क्रेडिट मिळू शकते. तसे झाल्यास कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देता येईल. शिवाय सध्या इंधनासाठी गाड्या उभ्या राहतात त्या सुद्धा राहणार नाहीत. मिळणाऱ्या उत्पन्नातून पैशांची व्यवस्था झाल्यानंतर किंवा सरकारने निधी दिल्यानंतर ती रक्कम बँकेला परत करता येईल. तसेच एसटी महामंडळाला रक्कम भरण्यास अडचण आली तर त्याचे व्याज देऊन ती रक्कम परत करता येईल. हा पर्याय स्वीकारल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार नाही व त्याबरोबरच इतर देणी सुद्धा थांबणार नाहीत. असेही बरगे यांनी म्हटले आहे.
उत्पन्न घटल्यामुळे वेतनात अडथळा
एसटीचे दररोज २२ कोटींचे होणारे उत्पन्न कोरोना काळात काही लाखांवर आले होते. सध्या साडे बारा हजार गाड्या रस्त्यावर येऊन सुद्धा फक्त साडे तेरा कोटींपर्यंत उत्पन्न पोहोचले आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महिन्याला २७० कोटींची आवश्यकता असते. पुरेसे उत्पन्न नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी वेळोवेळी राज्य सरकारची मदत घ्यावी लागते. मदतीच्या प्रक्रियेला उशीर झाल्यास वेतन मिळण्यासही उशीर होतो व त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर होत आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी सरकार समोर व एसटी प्रशासनासमोर हाच उत्तम पर्याय असल्याने तोच पर्याय तपासून पहावा, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
(हेही वाचाः एसटीत आत्महत्येचे सत्र सुरूच! २३व्या आत्महत्येने महामंडळ हादरले!)
Join Our WhatsApp Community